Tue, Sep 25, 2018 05:26होमपेज › Ahamadnagar › कुलटच्या घरात सापडले साठेखत

कुलटच्या घरात सापडले साठेखत

Published On: May 20 2018 1:40AM | Last Updated: May 20 2018 12:23AMनगर : प्रतिनिधी

उद्योजक बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरणाचे वाळकी येथील शेतकरी आत्महत्या प्रयत्नाच्या गुन्ह्याशी कनेक्शन उघड झाले आहे. वाळकीच्या घटनेतील आरोपी संतोष कुलट याच्या घरात टाकलेल्या छाप्यात पवार यांच्या मालमत्तेचे साठेखत सापडले आहे. खासगी सावकारांच्या घरात टाकलेल्या छाप्यात अनेक महत्त्वाची माहिती पोलिस व सहकार खात्याच्या हाती लागली आहे.

या छाप्यांत साठेखत, गहाणखते, खरेदीखते, इतर दस्तावेज, पैसे आरटीजीएसद्वारे दिल्याची कागदपत्रे मिळालेली आहेत. कटारिया जीजी या खासगी सावकारकी करणार्‍या महिलेने उद्योजक बाळासाहेब पवार यांना एक कोटी रुपये दिल्याची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागलेली आहेत. तसेच खासगी सावकार विनायक रणसिंग यानेही आरटीजीएसद्वारे पवार यांच्या खात्यात पैसे दिल्याचे पुरावे मिळाले आहेत. यशवंत कदम याच्या घरातील छाप्यातही महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत. 

चारही छाप्यांतून मिळालेली कागदपत्रे सहकार खात्याचे जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, सावकारांचे सहाय्यक निबंधक राम कुलकर्णी  यांनी गुन्ह्याचे तपासी अधिकारी किशोरकुमार परदेशी यांच्याकडे सोपविले आहेत, अशी माहिती सहकार खात्याच्यावतीने देण्यात आली आहे. बाळासाहेब पवार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात संतोष कुलट हा आरोपी नव्हता. तो वाळकी येथील शेतकर्‍यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात आरोपी होता.

परंतु, कुलट याच्या घरात पवार यांच्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे मिळालेली आहेत. या दोन्ही गुन्ह्यांचे कनेक्शन असल्याचा दावा ‘पुढारी’त 14 मे रोजीच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात करण्यात आला होता. तो पोलिसांनी सावकारांच्या घरावर टाकलेल्या छाप्यातून उघड झाला आहे. छाप्यातून मिळालेल्या कागदपत्रांची पोलिसांकडून तपासणी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजले. कटारिया जीजी, यशवंत कदम, विनायक रणसिंग या आरोपींना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.