होमपेज › Ahamadnagar › ‘पारनेरच्या सत्तापरिवर्तनाचा अध्याय मीच लिहिला’

‘पारनेरच्या सत्तापरिवर्तनाचा अध्याय मीच लिहिला’

Published On: Jun 03 2018 1:11AM | Last Updated: Jun 02 2018 11:36PMपारनेर : प्रतिनिधी

तालुक्याच्या राजकाणात नीलेश लंके म्हणेल तेच होणार, असे म्हणत गेल्या 23 तारखेला पारनेर नगरपंचायतीच्या सत्‍तापरिवर्तनाचा अध्याय आपणच लिहिल्याचा दावा लंके यांनी केला. जामगावचे उद्योजक सुरेश धुरपते यांचा वाढदिवस तसेच लोकनेते नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या शाखा उद्घाटनानिमित्‍त आयोजित कार्यक्रमात लंके यांनी आ. विजय औटी यांचे नाव न घेता जोरदार टिकास्त्र सोडले. 

लंके म्हणाले की, तालुक्याच्या राजकारणात प्रस्थापितांनी तडजोड केली आहे. मात्र हृदयातून पे्रम करणारी माणसे माझ्याकडे आहेत. ही माणसे कधीही तुम्हाला मिळाली नव्हती. मिळणारही नाहीत. प्रस्तापितांसोबत सध्या जे लोक आहेत, ते भाडोत्री आहेत. तालुक्यात गेल्या 50 वर्षांपासून घराणेशाही सुरू असून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्याच उचलायच्या का?  आता प्रस्थापितांना धडा शिकवायचा, हेच आपले ध्येय आहे. 

शासनाच्या पैशांवर कोणीही पाटीलकी करू शकतो, असा टोला लगावत रस्ते, सभामंडप उभारून विकास होत नाही, तर सर्वसामान्य जनतेच्या झोपडीपर्यंत जाऊन त्यांची सुख-दुःखे जाणून घेणार्‍या नेतृत्वाची तालुक्याला गरज आहे. सर्वसामान्य जनतेचे अश्रू पुसण्याचे काम जो करील तोच यापुढील काळात तालुक्याचे नेतृत्व करील. कार्यकर्त्यांनी जमविलेल्या गर्दीसमोर भाषण करून निघून जाण्याचे दिवस आता संपले असून सर्वसामान्य कायकर्ता ठरवील तोच शब्द तालुक्याच्या राजकारणात प्रमाण असणार आहे. तालुक्यातील सर्वच पक्षांना मी पोखरून काढले आहे. सध्या थोडे कार्यकर्ते उघड केले असून योग्य वेळी आपल्यासोबत दिग्गजांची फौज उभी असेल, असे सांगतानाच पारनेर नगरपंचायतीच्या सत्ता परिवर्तनाचा अध्याय आपणच लिहिला असल्याचा दावा लंके यांनी केला.

भाऊसाहेब कराळे, जयसिंग मापारी, राजेंद्र चौधरी, बाजीराव पानमंद, दादा शिंदे, ठकाराम लंके, बाबासाहेब तरटे, बापूसाहेब शिर्के, कैलास गाडीलकर, चंद्रकांत मोढवे, बाळासाहेब खिलारी, अभयसिंह नांगरे, भाउसाहेब चौरे, विजय औटी, प्रितेश पानमंद, दत्‍ता निवडुंगे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.