Fri, Apr 19, 2019 07:59होमपेज › Ahamadnagar › आंदोलनामुळे गाड्या दिवसभर बसस्थानकांतच उभ्या; पैशाअभावी वारकर्‍यांची झाली उपासमार

..अन् जिल्हाभरात बसेस धावू लागल्या

Published On: Jul 26 2018 1:30AM | Last Updated: Jul 26 2018 1:30AMनगर : प्रतिनिधी

नगर शहर व जिल्ह्यातील बहुतांश गावांत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाज आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याभरातील सर्वच मार्गावरील बससेवा दिवसभर ठप्प होती. त्यामुळे माळीवाडा व पुणे या दोन बसस्थानकांत शुकशुकाट  पसरला होता. तारकपूर बसस्थानकात मात्र पंढरपूरहून परतेलेल्या वारकर्‍यांची तोबा गर्दी उसळली होती. बससेवाच बंद असल्याने या वारकर्‍यांना बसस्थानकावरच थांबण्याची वेळ आली. पैसाअडका संपल्यामुळे बहुतांश गोरगरिब वारकर्‍यांची उपासमार झाली. दरम्यान, रात्री उशीरा तारकपूर बसस्थानकातून कल्याण, मुंबई वगळता उर्वरित सर्व मार्गावर बसेस सुरु केल्या आहेत. 

दोन दिवसांपासून सकल मराठा  क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षण व इतर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. पहिल्या दिवशी मंगळवारी (दि.24) नगर शहर वगळता उर्वरित जिल्ह्यात आंदोलन झाले. विविध ठिकाणी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठींबा मिळाला. या दिवशी आंदोलकांनी एसटी महामंडळाच्या गाड्यांनाच टार्गेट केले. संगमनेर तालुक्यात बस पेटविली गेली. एकंदरीत 10 बसेसची आंदोलकांकडून तोडफोड झाली. नगर-औरंगाबाद मार्गावरील कायगाव टोकाजवळ आंदोलकांनी रास्तारोको केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे महामंडळाने या दिवशी दिवसभर बसेस सोडल्या नाहीत. त्यामुळे नेवासा, नेवासा फाटा, औरंगाबाद, गंगापूर आदी ठिकाणी जाणार्‍या वारकर्‍यांची तारांबळ उडाली होती.  या वारकर्‍यांना तारकपूरवरच थांबवावे लागले. 

दुसर्‍या दिवशी काल (दि.25) नगर शहर बंदची हाक सकल मराठा क्रांती मोर्चाने दिली. या बंदच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्वच रस्त्यावर रास्तारोको करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला . त्यामुळे दुसर्‍या दिवशी देखील महामंडळाच्या गाडयांनाच लक्ष्य केले जाईल, त्यामुळे महामंडळाने बसेस न सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हाभरातील सर्वच मार्गावरील बससेवा ठप्प होती. जिल्हाभरात जवळपास 750 बसेस आहेत. या सर्व बसेस आपापल्या डेपोत उभ्या केल्या गेल्या. जिल्हाबाहेरुन येणार्‍या तसेच पंढरपूरहून येणार्‍या सर्व बसेस तारकपूर डेपोत थांबविण्यात आल्या होत्या. 

बससेवा ठप्प असल्याने, महामंडळाचे एका दिवसांचे तब्बल 60 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तारकपूर डोपोचा यामध्ये 20 लाखांचा समावेश आहे. बसेस ठप्प असल्याने, जिल्हाभरातील गोरगरिब जनतची चांगलीच तारांबळ उडाली. पंढरपूरहून आलेल्या वारकर्‍यांत मोठया प्रमाणात गोरगरिब जनतेचा सहभाग आहे. गाडयाअभावी या वारकर्‍यांना तारकपूर बसस्थानकातच थांबावे लागले. परतीचा प्रवास असल्याने, बहुतांश वारर्‍यांकडे पैसेच शिल्‍लक नसल्याने, त्यांची उपासमार झाली.

काल रात्री वाहतूक व्यवस्था सुरळीत असल्याने बसेस सुरु करण्यास हरकत नसल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले. गाड्यांना पोलिस संरक्षण नाही परंतु मार्गावर सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला गेला आहे. त्यामुळे बसेसची तोडफोड होणार नसल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले. त्यानुसार महामंडळाने काल (दि.25) रात्री उशीरा मुंबई. कल्याण मार्ग वगळता उर्वरित धुळे , नाशिक, पुणे, औरंगाबाद आदी मार्गावरील बसेस सुरु केल्या असल्याचे वाहतूक निरीक्षक रोहित रोकडे यांनी सांगितले. बसेस सुरु झाल्यामळे बसस्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांना व वारकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. 

पोलिस बंदोबस्तात सोडल्या 27 गाड्या

सोमवारी(दि.23) कायगाव टोका येथील आंदोलन तीव्र झाले.त्यातून  नगर-औरंगाबाद रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.  त्यामुळे या मार्गावरील बससेवा बंद केली गेली होती. दरम्यान, मंगळवारी या मार्गावरील रास्तारोको आंदोलन मागे घेतले गेल्याने, सायंकाळी वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे महामंडळाने मंगळवारी रात्री उशीरा तारकपूर येथील औरंगाबाद, जळगाव या जिल्ह्यातील वारकर्‍यांच्या 27 बसेस पोलिस बंदोबस्तात औरगाबादला पोहोचविल्याचे  तारकपूर डेपोचे वाहतूक निरीक्षक रोहित रोकडे यांनी सांगितले.