Thu, Apr 25, 2019 16:06होमपेज › Ahamadnagar › बुरुडगावला खतासह इंधन निर्मिती!

बुरुडगावला खतासह इंधन निर्मिती!

Published On: Jul 16 2018 1:25AM | Last Updated: Jul 15 2018 11:23PMनगर : प्रतिनिधी

शहरातून संकलन होणार्‍या कचर्‍याची शास्त्रोक्‍त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी खत निर्मिती प्रकल्पासह आता ‘आरडीएफ’ (रिफ्युज डिराईव्ह्ड फ्युएल) या इंधन निर्मिती प्रकल्पाची उभारणीही मनपाकडून केली जाणार आहे. बुरुडगाव कचरा डेपोतच हा प्रकल्प होणार असून खतनिर्मितीनंतर शिल्लक राहणार्‍या टाकाऊ कचर्‍यावर या प्रकल्पाद्वारे प्रक्रिया केली जाणार आहे. स्थायी समितीच्या सभेत आज (दि.16) या निविदेवर शिक्कामोर्तब होणार आहे.

कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी त्यावर शास्त्रोक्‍त प्रक्रीया करुन खतनिमिर्ती करण्याचे निर्देश शासनाने यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार मनपाने बुरुडगाव व सावेडी कचरा डेपोमध्ये खतनिर्मिती प्रकल्पांची उभारणी केली आहे. या प्रकल्पाद्वारे कचर्‍याचे विलगीकरण होऊन ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते व त्यातून खतनिर्मिती केली जाते. बुरुडगाव कचरा डेपोतील प्रकल्पातून तयार होणार्‍या खताला शासनानेही मानांकन देवून ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रँण्ड प्रदान केला आहे. खतनिर्मि तीनंतर शिल्लक राहणार्‍या टाकाऊ कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी मनपाने लॅण्डफिल साईटचीही निर्मिती केली आहे.

शासनाने घनकचरा अधिनियमात 2016 साली केलेल्या सुधारणांमध्ये लॅण्डफिल साईटवर कमीत कमी कचरा टाकला जावा यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यानुसार ‘आरडीएफ’ प्लँट प्रस्तावित करण्यात आला आहे. खतनिर्मिती प्रक्रियेनंतर शिल्लक राहणार्‍या कचर्‍यावर या प्रकल्पाद्वारे प्रक्रिया होणार आहे. त्यातून कोळशाप्रमाणे वापरल्या जाऊ शकणार्‍या इंधनाची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे लॅण्डफिल साईटवर ‘डम्प’ केलेल्या जाणार्‍या टाकाऊ कचर्‍यातही घट होणार आहे. स्थायी समितीने निविदेला मंजुरी दिल्यानंतर आगामी तीन महिन्यात या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे.

दरम्यान, बुरुडगाव कचरा डेपोतील 50 टन क्षमतेच्या खतनिर्मिती प्रकल्पाची मुदत संपल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकल्प बंद आहे. परिणामी, शहरातील सर्व कचरा सध्या सावेडी कचरा डेपोत टाकला जात आहे. या प्रकल्पासाठी मनपाने फेब्रुवारी महिन्यात मागविलेल्या निविदा तब्बल तीन महिन्यांनी स्थायी समोर मंजुरीसाठी सादर करण्यात आल्या आहेत. ‘स्थायी’च्या मंजुरीनंतर हा खतनिर्मिती प्रकल्प पुन्हा कार्यान्वित होणार आहे.

‘छाननी समिती’चा असाही अट्टहास!

खतनिर्मिती प्रकल्प तसेच आरडीएफ प्रकल्पासाठी प्रति मे.टन 1470 रुपये असा दर पी. एच. जाधव या संस्थेने प्रस्तावित केला आहे. सर्वांत कमी दराची निविदा असतांनाही छाननी समितीने (ज्या समितीने कागदपत्रांची तपासणी करायची असते) ‘वाटाघाटी’चा प्रयत्न केला. कुठलेही कारण न देता समितीने 1200 रुपये दराची शिफारस करत ‘स्थायी’ची कोंडी केली आहे. दर कमी करण्याचा अट्टहास करणार्‍या समितीने दर परवडणारे नव्हते तर फेरनिविदेची शिफारस का केली नाही? असाही सवाल यामुळे उपस्थित होत आहे.