Fri, Apr 26, 2019 18:11होमपेज › Ahamadnagar › जाळपोळ, तोडफोड अन् रास्तारोको जनतेच्या असंतोषाचा भडका.  

जाळपोळ, तोडफोड अन् रास्तारोको जनतेच्या असंतोषाचा भडका.  

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 08 2018 11:38PMश्रीरामपूर : गोरक्षनाथ शेजुळ

शांतताप्रिय मात्र डाव्या विचारांच्या समजल्या जाणार्‍या नगर जिल्ह्याला चळवळींचा मोठा इतिहास आहे. प्रामुख्याने मराठा मूकमोर्चा, शेतकरी संप, दूधदर आंदोलन आणि सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनातही नगरने राज्याचे लक्ष वेधले आहे. या आरक्षण लढ्यात अनेक ठिकाणी बंद, तहसील, प्रांत कचेरीवरील धडक मोर्चे, मुख्यमंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळे दहन यासह तब्बल 34 पेक्षा अधिक रास्तारोको तर एसटी महामंडळाच्या 5 बसेसचे नुकसान करत मराठा आंदोलक पेटून उठल्याचे दिसले. तसेच याप्रकरणी 25 गुन्ह्यात 500 जणांवर गुन्हे दाखल आहेत.

गेल्या काही वर्षात जिल्ह्यात शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी, वाहतूकदार, विविध जाती संवर्ग, कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याचे दिसले. त्यातच कोपर्डी सारख्या घटनेतून मराठा समाजानेही वज्रमूठ बांधल्याचे चित्र आहे.  त्यातून मराठा मूकमोर्चा आंदोलनाला सुरुवात झाली होती. नगरमधूनही हे आंदोलन तीव्र बनल्याने राज्यभर याचे पडसाद पहायला मिळाले. त्यातून मराठा आरक्षणाचा लढा व्यापक बनला. दरम्यानच्या काळात  कर्जमाफीसह हमीभाव व अन्य मागण्यांसाठी पुणतांबा येथून शेतकर्‍यांनी संपाची हाक दिली. या संपातही शेतकर्‍यांनी पेरण्या बंद, भाजीपाला पुरवठा बंद, दूध बंद आंदोलन हाती घेऊन सरकारची कोंडी केली होती. मात्र, त्यानंतरही सरकारने तत्वतः व अंशतः या मागण्या मान्य केल्याने आंदोलनांची धग कायम होती. सरकारने 27 रुपये भाव जाहीर करूनही मिळत नसल्याने पुन्हानगरमधूनच दूधदरासाठी आंदोलन सुरू झाले. या आंदोलनातून मुंबई, पुणे, नागपूरचा दूध पुरवठा बंद करून शेतकर्‍यांनी नगरची ताकद दाखवून दिली. तसेच मध्यंतरीच्या नोटाबंदी, जीएसटीच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी वर्गाने सरकारविरोधात एल्गार पुकारल्याचे पहायला मिळाले. असे एक ना अनेक आंदोलन शमत नाही तोच पुन्हा शेतकर्‍यांच्या मुलांना मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागले. 

औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या युवकाने मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतल्यानंतर या आंदोलनाने उग्र रूप धारण केले. अहमदनगर जिल्ह्यात सकल मराठा समाजाने काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहतानाच अनेक ठिकाणी सरकारच्या निषेधासाठी ठोकमोर्चा हाती घेतला. 10 जुलैपासून सुरू झालेले हे आंदोलन काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानानंतर मात्र चिघळले. सरकारच्या निषेधार्थ जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात 34 रास्तारोको, 40 पेक्षा अधिक ठिय्या आंदोलने, 5 बसची तोडफोड अशा हिंसक घटना घडल्या. यामधून पोलिसांनी दाखल केलेल्या 25 गुन्ह्यात सुमारे 500 आंदोलकांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली. अशा परिस्थितीत सरकार आरक्षण देत नसल्याने नगरमध्ये पुन्हा एका मराठा तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने आंदोलकांच्या भावना आणखी तीव्र होताना दिसल्या. त्यातून आज 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने तसेच जेलभरोचेही आवाहन करण्यात आल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. 

या पंधरवाड्यात जिल्ह्यात दररोज वेगवेगळ्या भागात बंदच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेक ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळले आहेत, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालयावर धडक मोर्चे सुरू आहेत. एसटी सेवा विस्कळीत झाली, मराठा समाज चिडून रस्त्यावर उतरला आहे. ठिय्या आंदोलनातही सरकारला लक्ष्य केले जात आहे.एकदंरीत, गेल्या तीन-चार वर्षापासून सरकारच्या धोरणांविरोधात तसेच विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी जिल्ह्यात आंदोलनाचे पेव फुटले आहे. ऊसदर, कांदा, कापूस, तूर, डाळींब हमीभावावरून नगरमध्ये सरकारविरोधातील भावना पुर्वीपासूनच तीव्र आहेत. 

सरकारने मराठा आरक्षणाबरोबरच अन्य समाजाला योग्य प्रतिनिधीत्व द्यावे, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थ्यांचे मुलभूत प्रश्‍न मार्गी लावावेत, व्यापार, व्यवसायाला चालना देतानाच समाजातील दुर्बल व वंचित घटनांनाही न्याय देण्यासाठी सकारात्मक धोरणे राबवावीत, अन्यथा मध्यंतरी शांतताप्रिय व संयमी बनलेल्या या अहमदनगर जिल्ह्यात आपल्या हक्कांसाठी तरूणवर्ग नक्षलवादी बनण्याची भिती असून वाढता असंतोष त्याचे संकेत आहेत.

पोलिस प्रशासनाची दमछाक..! 

जिल्ह्यात दूध आंदोलनापासून ते सध्याच्या मराठा आरक्षण आंदोलनापर्यंत्तच्या महिनाभराच्या कालावधीत पोलिस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे. मध्यंतरी दूधबंद आंदोलनात टँकरला संरक्षण देण्यासाठी पोलिस अहोरात्र कर्तव्य बजावत होता तर त्यानंतर लागलीच मराठा आंदोलन सुरू झाल्याने पोलिसांना पुन्हा बंदोबस्ताची भागमभाग करावी लागत आहे. अशा परिस्थितीत रास्तारोको, तसेच बसच्या जाळपोळीच्या घटनाही घडत आहेत, तसेच आजच्या जिल्हा बंद आंदोलनातही पोलिस प्रशासनाची  मोठी कसरत सुरू असल्याचे दिसून येत आहे.