होमपेज › Ahamadnagar › श्रीगोंद्यात धाडसी घरफोड्या

श्रीगोंद्यात धाडसी घरफोड्या

Published On: Jun 10 2018 1:47AM | Last Updated: Jun 09 2018 11:16PMश्रीगोंदा : प्रतिनिधी

श्रीगोंदा शहरातील हनुमाननगर येथील दुर्योधन देविदास वडेकर यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी तीन लाखांचा, तर घोगरगाव येथील सुनील शिवाजी कसाब यांच्या घरातून एक लाख, असा चार लाखांचा ऐवज लंपास केला. तसेच टकले यांचे घर फोडले. मात्र किती ऐवज चोरीस गेला, त्याची माहिती मिळू शकली नाही. काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या बंगल्याचे गेट तोडण्याचा प्रयत्न करून एक दुचाकी चोरून नेली.

याबाबत दुर्योधन देविदास वडेकर व सुनील कसबे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, घोगरगाव येथील सुनील कसाब यांच्या बंद घराचा  दरवाजा तोडून चोरट्यांनी दहा हजार रुपये रोख, एक मोबाईल व दोन  तोळ्याचे नेकलेस,  असा एक लाखाचा ऐवज चोरून नेला.  तसेच श्रीगोंदा शहरातील हनुमाननगर येथील दुर्योधन देविदास वडेकर हे शुक्रवारी (दि.8) शेतात गेले होते. परंतु रात्री सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे त्यांनी सासुरवाडीला मुक्काम केला. त्यामुळे चोरट्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून रोख 20 हजार रुपयांसह घरातील तब्बल 8 तोळे सोने, असा तीन लाखांचा ऐवज लंपास केले. हा प्रकार सकाळी वडेकर यांच्या शेजारी राहणार्‍या विनोद पाटील यांनी सांगितला. त्यानंतर वडेकर यांनी तत्काळ घराकडे धाव घेतली. घरातील सामानाची चोरट्यांनी उचकापाचक केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्याला माहिती दिली.

पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून त्यांनी तत्काळ ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाला ही पाचारण केले. श्वान पथकाने काही अंतर जाऊन बालाजीनगरमधील सुदाम खेंडके यांच्या घरापर्यंत माग काढला. खेंडके यांचीही दुचाकी चोरीस गेली. त्यानंतर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जबरी चोरीसह दोन्ही ठिकाणी घरफोडी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रेवणनाथ दहिफळे व भारती हे करत आहेत.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरटे कैद झाले आहेत. परंतु त्यांचे चेहरे व्यवस्थित दिसत नाहीत. या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांना या फुटेजची मदत होणार आहे.