Sat, Apr 20, 2019 08:17होमपेज › Ahamadnagar › बांधकाम परवाने ऑनलाईन!

बांधकाम परवाने ऑनलाईन!

Published On: Jul 28 2018 1:31AM | Last Updated: Jul 27 2018 10:07PMनगर : प्रतिनिधी

नगररचना विभागाकडून देण्यात येणारे बांधकाम परवाने ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर आता महापालिकेने येत्या ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरु केली आहे. 1 ऑगस्टपासून ही प्रणाली कार्यरत केली जाणार असून बांधकाम परवान्यांसाठीचे अर्ज, तपासणी व परवानगी या संपूर्ण प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेपाला लगाम बसणार आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर मार्गदर्शनासाठी काल (दि.27) जिल्हाधिकारी कार्यालयात शहरातील बांधकाम व्यावसायिक, अभियंत्यांची कार्यशाळा घेण्यात आली.

बांधकाम परवाने ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे देण्याच्या प्रयोजनासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून शासनस्तरावर तयारी सुुरु होती. संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी खासगी संस्थांची मदतही ‘महा आयटी’ला उपलब्ध करुन देण्यात आली होती. बांधकामांसाठी लागणार्‍या विविध परवानग्या देण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी शासनस्तरावर ‘पोर्टल’ व ‘बिल्डींग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम’ कार्यरत करण्यात आली आहे. नगरपरिषदांमध्ये याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून आता सर्व ‘ड’ वर्ग महापालिकांमध्येही याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर ऑनलाईन संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी महापालिकेत करण्यासाठी नगरविकास विभागाने मार्च महिन्यातच नगर महापालिकेला आदेश दिले होते.

त्यानुसार ऑनलाईन बिल्डींग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टिमवर शहरातील ‘आर्किटेक्ट’च्या नोंदणीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून महापालिकेच्या नगररचना विभागातून सर्व बांधकाम परवानग्या ऑनलाईन दिल्या जाणार आहे. काल प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी व नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक राजेश पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट इंजिनिअर संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांची कार्यशाळा पार पडली. यात ‘महाआयटी’च्या अधिकारी, प्रतिनिधींकडून प्रणालीच्या वापराबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. येत्या दोन दिवसांत याबाबत अधिकृतपणे महापालिकेकडून सूचना जारी करण्यात येणार असल्याचे राजेश पाटील यांनी ‘पुढारी’शी बोलतांना सांगितले.

चुकीच्या परवान्यांना बसणार चाप!

ऑनलाईन प्रणालीद्वारेच बांधकाम परवान्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्याची तपासणी, छाननीही संगणाद्वारेच होणार आहे. त्यामुळे प्लॅनमधील त्रुटींची पूर्तता झाल्याशिवाय संगणकीय प्रणालीद्वारे परवाना मिळणार नाही. त्यामुळे चुकीच्या व नियमबाह्य सवलती देवून दिल्या जाणार्‍या बांधकाम परवानग्यांना यापुढे चाप बसणार आहे. सर्वकाही ऑनलाईन होणार असल्याने चुकीच्या परवानग्यांसाठी राजकीय नेते, पदाधिकार्‍यांकडून अधिकार्‍यांवर दबाव टाकण्याच्या प्रकारांनाही आळा बसणार आहे.