Thu, Apr 25, 2019 17:37होमपेज › Ahamadnagar › बजेटमध्ये 28 कोटींची तरतूद करणार

बजेटमध्ये 28 कोटींची तरतूद करणार

Published On: Feb 04 2018 1:50AM | Last Updated: Feb 04 2018 1:05AMनगर : प्रतिनिधी

येथील  नव्याने होत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासाठी 28 कोटींची गरज आहे. त्यानुसार आगामी अर्थसंकल्पात याबाबत तरतूद करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. नगर दौर्‍यावर आले असता पाटील यांनी बांधकाम सुरु असलेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री राम शिंदे व जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी ह्या प्रशासकीय इमारतीची माहिती देत काम पूर्ण होण्यासाठी 28 कोटींच्या निधीची गरज असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. याबाबतचा प्रस्तावही शासन दरबारी असल्याचे सांगितले.
सद्यस्थितीत इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून, त्यानंतर फर्निचर व विजेची जोडणी करावी लागणार आहे.

पाटील यांनी यावेळी संबंधित ठेकेदाराला लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच वर्षभरात नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन होईल, असे नियोजन करण्यास सांगितले. बाळासाहेब थोरात महसूलमंत्री असताना जिल्हा प्रशासनासाठी नवीन भव्य अशी इमारत असावी अशी त्यांची संकल्पना होती. त्यानुसार त्यांनी इमारतीचा आराखडा तयार करण्याचे सुचवले होते. त्यानुसार आराखडा तयार झाला. त्यानंतर मात्र इमारतीची व्याप्ती वाढवण्याचे ठरले. त्यानुसार 28 ऑगस्ट 2013 रोजी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. 
एकूण 15 हजार 810 चौरस मीटर इतक्या क्षेत्रावर इमारतीचे काम आहे.

इमारतीचा तळमजला तसेच त्यावरील मजला हा वाहनतळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. एकाचवेळी 130 चारचाकी गाड्या व 70 दुचाकी गाड्या बसू शकतील अशी वाहनतळाची रचना आहे. वाहनतळाचे दोन मजले तसेच मुख्य कार्यालयाचे 5 असे एकूण सात मजले या इमारतीत असणार आहेत. इमारतीच्या मागील बाजूला 2 मजले असणार असून त्याठिकाणी 400 आसन क्षमतेचे सभागृह असणार आहे. सभागृहाच्या शेजारीच उपहारगृह असेल. दुसर्‍या मजल्यापासून वरील सर्व मजले हे महसूल विभागाचे कार्यालये असणार आहेत. इमारतीच्या चारही बाजूने इमारतीत जा-ये करण्यासाठी लिफ्ट (उद्वाहक) असल्याने या ठिकाणी कामासाठी येणार्‍या नागरिकांची दमछाक कमी होणार आहे.