Mon, Apr 22, 2019 23:55होमपेज › Ahamadnagar › नगरसेवक बंधूंनो, चला उपोषण करुया..!

नगरसेवक बंधूंनो, चला उपोषण करुया..!

Published On: Jun 22 2018 2:09AM | Last Updated: Jun 21 2018 10:47PMनगर : प्रतिनिधी

पथदिवे हा महापालिकेकडून पुरविल्या जाणार्‍या मूलभूत सुविधांचाच भाग आहे. मात्र, पथदिवे दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करुनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. गेल्या वर्षभरापासून साहित्य उपलब्ध होत नाही. प्रभागातील तब्बल 84 पथदिवे बंद असून, येत्या 7 दिवसांत दुरुस्तीचे साहित्य उपलब्ध झाले नाही, तर आयुक्‍तांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा इशारा मनसे गटनेते नगरसेवक गणेश भोसले यांनी दिला आहे. तसेच ज्या नगरसेवकांना अशा प्रश्‍नांना तोंड द्यावे लागत असेल, त्यांनीही उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

प्रभागातील पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी गेल्या वर्षभरापासून साहित्याची मागणी केली आहे. मात्र, मागील सहा महिन्यात केवळ एक बल्ब विद्युत विभागाने दिला. प्रभागातील तब्बल 84 पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. काही पथदिवे स्वखर्चातून दुरुस्त केले आहेत. प्रभागात अंधाराचे साम्राज्य असून याबाबत प्रशासन व सत्ताधार्‍यांचे वारंवार लक्ष वेधूनही दखल घेतली जात नाही. साहित्य उपलब्ध करुन दिले जात नाही. प्रशासन व सत्ताधारी मोठा आर्थिक फायदा असलेल्या विषयातच लक्ष देत आहेत. त्यामुळे पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी साहित्य उपलब्ध करुन देण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील बहुतांशी भागांत हीच अवस्था आहे. त्यामुळे प्रशासन व सत्ताधार्‍यांनी यात लक्ष घालून 7 दिवसांच्या आत साहित्य उपलब्ध करुन न दिल्यास आयुक्‍तांच्या दालनासमोर उपोषण करण्याचा इशारा नगरसेवक भोसले यांनी आयुक्‍तांना निवेदनाद्वारे दिला आहे.दरम्यान, महापालिकेतील ज्या नगरसेवकांना अशा प्रश्‍नांना सामोरे जावे लागत असेल, त्यांनीही माझ्या बरोबर उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहन गणेश भोसले यांनी इतर नगरसेवकांना केले आहे.

‘स्टोअर’मधून साहित्याची परस्पर विल्हेवाट!

शहरात पथदिव्यांची कामे झाल्यानंतर किंवा दुरुस्तीनंतर साहित्यावर मनपाचे नाव व नंबरची नोंद करण्याबाबत स्थायी समितीच्या सभेत सूचना दिल्या होत्या. मात्र, अद्यापही याची अंमलबजावणी होत नाही. दुरुस्तीसाठी साहित्य नसल्याचे वारंवार सांगितले जाते, असे सांगत स्टोअर विभागाकडून विद्युतच्या साहित्याची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे यांनी केला आहे.

विरोधी पक्षनेतेही उपोषणात सहभागी होणार!

विद्युत विभागाचे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहेत. कुणीही अधिकारी जबाबदारी घेत नसल्याने कामकाजाचा खोळंबा झाला आहे. पथदिव्यांच्या दुरुस्तीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. याबाबत उपायुक्‍तांशी चर्चा करुन दुरुस्ती तात्काळ सुरु करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे प्रश्‍न मार्गी न लागल्यास नगरसेवक गणेश भोसले यांच्याबरोबर उपोषणात सहभागी होणार असल्याचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी ‘पुढारी’शी बोलतांना सांगितले.

पथदिव्यांच्या सर्वच कामांची चौकशी व्हावी!

पथदिव्यांच्या 19 कामांमधील 34 लाखांचा घोटाळा उघडकीस आला असला, तरी त्या काळात व पूर्वी झालेल्या इतर कामांमध्येही अनेक घोटाळे झालेले आहेत. त्याबाबत तक्रारीही झालेल्या आहेत. त्यामुळे सर्वच कामांची चौकशी करावी, अशी मागणी बाळासाहेब बोराटे यांनी केली आहे. तसेच नगरोत्थान योजनेतील 3.30 कोटींच्या पथदिवे कामातही घोटाळाच आहे. याबाबत पोलिसांकडे रितसर फिर्याद देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.