Sun, Jul 21, 2019 08:13होमपेज › Ahamadnagar › बोगस सातबार्‍याचे गौडबंगाल कधी उलगडणार

बोगस सातबार्‍याचे गौडबंगाल कधी उलगडणार

Published On: May 29 2018 1:45AM | Last Updated: May 28 2018 11:38PMश्रीगोंदा : अमोल गव्हाणे

येळपणे शिवारातील गट क्रमांक 88/35 व 88/39 वर्ग 2 चे बोगस सात बारा उतारे तयार करून ते उतारे शेतकर्‍यांना वितरित केल्याचा प्रकार मागील आठवड्यात उघडकीस आला. बोगस सात-बारा उतारे तयार करून त्यावर कर्जही घेण्यात आले. या बोगस सात बारा प्रकरणामध्ये बरीच मंडळी सहभागी असून त्याचा मास्टर माइंड वेगळाच असल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचे नेमके गौडबंगाल काय आहे ?हे शोधून काढण्यासाठी महसूल यंत्रणेने कचखाऊ भूमिका न घेता संबधित प्रकरणाची शहनिशा करून संबधित लोकांवर गुन्हे दाखल केल्यास ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होण्यास मदत होणार आहे.

येळपणे येथे शासकीय शेतजमीन आहे. या जमिनीचे बोगस फेरफार तयार करून त्या जमिनीचे सातबारा उतारे तयार करण्यात आले आहेत. ऑनलाईन कामकाजाबाबत कोणतेही अधिकार नसताना 88/35, 88/39 या गटांमधील चुकीचा अंमल दिसून आलेला आहे. तहसीलदार महेंद्र माळी यानी केलेल्या प्राथमिक चौकशीत ही बाब समोर आली आहे. आता हे प्रकरण प्रांताधिकारी गोविंद दाणेज यांच्या कार्यालयात पुढील कार्यवाही साठी प्रस्तावित आहे.  गट क्रमांक 88/ 35 व88 /39 मध्ये लोणी व्यंकनाथ येथील पाच शेतकर्‍यांची नावे आली आहेत.

लोणीव्यंकनाथचे राजेंद्र झुंबर काकडे यांनी या संदर्भात दि 19 मे रोजी तक्रार केली होती .या तक्रारीची दखल घेत तहसीलदार  महेंद्र महाजन यानी  तलाठी धांडे यांना खुलासा मागितला होता. त्यावर चार दिवसांनी  तलाठी यानी आपला खुलासा सादर केला आहे. त्यामध्ये त्यांनी  असे नमूद केले आहे की, 88 गट क्रमांकाचे हस्तलिखित सात-बारा उतारे संगणकीकृत केले असून त्याप्रमाणे परिशिष्ट तयार करण्यात आले. म्हणजेच पूर्वी जे हस्तलिखित उतारे होते तेच उतारे संगणकीकृत केल्याचे त्यांनी म्हटले आहे. यातील सगळ्यात गंमतीशिर बाब म्हणजे यातील एका महिलेच्या नावे जो सात बारा उतारा निघाला आहे, त्यावर्षी त्या महिलेचे लग्नही झाले नव्हते. याचाच अर्थ या प्रकरणातून बचाव करण्यासाठी ही नोंद आता ओढली असण्याची अधिक शक्यता आहे. 1999- 2000 मध्ये येळपणे येथे कामगार तलाठी कार्यरत होते त्यांचे हस्ताक्षर आणि आताच्या 7/12 पुस्तकावर जे हस्ताक्षर आहे त्याची पढताळणी करावी लागनार आहे. त्यातून सत्य बाहेर येण्यास मोठी संधी आहे. 

दरम्यान, हे बोगस सात बारा उतारे तयार करण्यात एका मोठ्या मास्टरमाईंडचा हात असल्याचे बोलले जात आहे.  या प्रकरणातील पूर्ण सत्य बाहेर आणण्यासाठी तक्रारदार राजेंद्र काकडे यांनी संबधित लोकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. ही मागणी रास्त असून अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर या प्रकरणातील नेमके सत्य आणि त्या मागील मास्टरमाईंड कोण हे पोलिस तपासात उघड होईल.

पैसे कसे भरले 

बोगस सात बारा उतार्‍यावर  जवळपास चार लाख रुपयांचे जिल्हा सहकारी बँकेचे कर्ज काढण्यात आले होते. पण बोगस सात बारा उतारा प्रकरण माध्यमामधून प्रसिद्ध झाल्यानंतर बँकेच्या अधिकार्‍यानी आपल्यावर बालंट नको म्हणून संबधित लोकांना विनंती करून कर्ज भरण्यास सांगितले. या पैशाचा भरणा झाला असल्याचे तालुका विकास अधिकारी भरत इथापे यांनी स्पष्ट केले आहे.  दरम्यान, बोगस उतार्‍यावर कर्ज दिले कसे याची सहायक निबंधकानी चौकशी सुरू केली आहे. एका पुढार्‍याने काहीच चौकशी करायची नाही. ती चौकशीची कागदपत्र बाजूला फेकून द्या, अस सांगितले असल्याची चर्चा आहे. 

हे तर हिमनगाचे टोक 

येळपणे येथील बोगस सात बारा प्रकरण उघड झाल्यानंतर त्या गावात अनेकांच्या नावे बोगस सात बारा उतारे तयार करून दिले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वरील प्रकरण हे हिमनगाचे टोक असल्याचे बोलले जात आहे. 

तात्काळ कार्यवाही अपेक्षित 

महसूल विभागाकडे तक्रार दाखल होऊन आठ दिवस उलटले. विषय गंभीर असल्याने महसूल प्रशासनाने कागदी घोडे नाचविण्यात कुठलेही हाशिल नाही. अशा पद्धतीने कुणी स्वतःच्या आर्थिक लाभापायी शासकीय बोगस सात बारा उतारे तयार करून ते वितरित करत असेल तर ती शासनाची मोठी फसवणूक म्हणावी लागेल. या प्रकरणात तहसीलदार महेंद्र माळी यांनी लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करने अपेक्षित आहे.