Wed, Jul 17, 2019 16:23होमपेज › Ahamadnagar › बोगस पटसंख्या : चार मुख्याध्यापकांवर होणार फौजदारी

बोगस पटसंख्या : चार मुख्याध्यापकांवर होणार फौजदारी

Published On: Jul 31 2018 1:28AM | Last Updated: Jul 31 2018 12:25AMनगर : प्रतिनिधी

2011 साली झालेल्या विशेष पटपडताळणी मोहिमेत बोगस पटसंख्या दाखविलेल्या जिल्ह्यातील चार शाळांच्या मुख्याध्यापकांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने फौजदारी दाखल करण्याची पूर्वतयारी सुरु केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

राज्यातील जवळपास 1400 शाळांमध्ये बोगस पटसंख्या दाखवून शासनाचे कोट्यवधींचे अनुदान लाटल्याचा प्रकार मध्यंतरी समोर आला होता. त्यानंतर शासनाच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये पटपडताळणी केली. बोगस पटसंख्या दाखवून अनुदान लागणार्‍या संस्थेच्या मुख्याध्यापकांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात अशा प्रकारे बोगस पटसंख्या दाखवून अनुदान घेतलेल्या चार शाळा आहेत.

बीड जिल्ह्यातल्या परळी येथील शिक्षक ब्रिजमोहन मिश्रा यांनी बोगस पटसंख्येविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने सुनावणीदरम्यान अशा शाळांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार राज्याच्या शिक्षण संचालकांनी कारवाई करण्यासंबंधात सर्व शिक्षणाधिकार्‍यांना परिपत्रक काढले. यामुळे बोगसगिरी करणारे अनेक संस्थाचालक, मुख्याध्यापक कारवाईच्या कचाट्यात सापडणार आहेत.सर्व शाळांमध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकाराने पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. त्यामध्ये राज्यभरात दीड लाख विद्यार्थी बोगस दाखविले असल्याचे समोर आले होते. बोगस पटसंख्येच्या आधारे वाढीव तुकड्या मंजूर करून घेत शिक्षकांची अतिरिक्त पदे भरण्यात आली होती. यासह शासनाच्या विविध योजनांवरील शालेय पोषण आहार, गणवेश, लेखन साहित्य, मोफत पाठयपुस्तके, स्वाध्याय पुस्तिका, उपस्थिती भत्ता, टर्म फी, शिष्यवृत्ती याचा लाभ मिळवून गैरप्रकार झाल्याचे समोर आले होते.

तीन खाजगी, एक जिल्हा परिषद शाळा

बोगस पटसंख्या दाखविलेल्या शाळांमध्ये तीन खाजगी शाळा असून एक शाळा जिल्हा परिषदेची आहे. खाजगी शाळांमध्ये अभिनव बालविकास मंदिर (नगर), सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर (कसबेवस्ती, नगर), मॉडर्न उर्दू स्कुल (शेवगाव) तर राहुरी तालुक्यातील खडकवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा समावेश आहे. यापैकी मॉडर्न उर्दू स्कुल ही शाळा बंद झाली असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. वरील शाळांनी किती अनुदान लाटले याची माहिती घेण्यात येत असून, त्यानंतर फौजदारी दाखल होईल.