Wed, Mar 20, 2019 08:31होमपेज › Ahamadnagar › ब्लॉग : व्याह्यांच्या राजकारणाने नगरची घुसमट!

ब्लॉग : व्याह्यांच्या राजकारणाने नगरची घुसमट!

Published On: Apr 12 2018 7:34AM | Last Updated: Apr 12 2018 7:34AMअहमदनगर वार्तापत्र : अनिरुद्ध देवचक्के

नगर-नेवासा या तत्कालीन मतदारसंघात काँग्रेस नेते दादा पाटील शेळके यांचे साम्राज्य होते. तालुक्यातील सेवा सोसायट्या, मार्केट कमिटी, दूध संघ, जिल्हा बँक अशा सर्व ठिकाणी दादा पाटलांचे कार्यकर्ते सत्तेवर होते. बराच काळ ही सत्ता शेळके गट उपभोगत असल्याने त्यांच्या विरोधात लाट तयार व्हायला लागली होती; परंतु त्यांना भिडेल असा दुसरा पर्यायी नेता तालुक्यात तयार होत नव्हता. याच काळात शिवाजीराव कर्डिले हे नेतृत्व उदयास यायला प्रारंभ झाला. शिवाजी कर्डिले यांचा दूध विक्रीचा व्यवसाय होता. 

1995 मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि दादा पाटील शेळके यांच्या विरोधात शिवाजी कर्डिले यांनी निवडणूक लढवावी म्हणून आग्रह वाढू लागला. शेवटी त्यांनीही रिंगणात उतरायचं ठरवलं. कर्डिले यांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन दादा पा. शेळके यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या तत्कालीन अधिकारी विजयाताई कुटे यांना नोकरीचा राजीनामा द्यायला लावून काँग्रेसकडून रिंगणात उतरवलं होतं. शरद पवार यांनी त्यांच्यासाठी प्रचाराच्या सभा घेतल्या. इकडे कर्डिले यांनीही मतदारसंघ पिंजून काढला. केडगावातून भानुदास कोतकर यांची त्यांना साथ मिळाली आणि पाहता पाहता कर्डिले सर्वप्रथम 1995 मध्ये अपक्ष आमदार म्हणून निवडूनही आले.

याच निवडणुकीत शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर अनिल राठोड आमदार म्हणून निवडून आले होते. राज्यात युतीचे सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्यानंतर अपक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले यांना युतीत खेचण्याची जबाबदारी राठोड यांच्यावर टाकण्यात आली होती. ते नगरहून कर्डिले यांना घेऊन मुंबईला निघाले खरे; परंतु कर्डिलेंनी वाटेतच त्यांची साथ सोडली. पुढे 1999 च्या निवडणुकीतदेखील पुन्हा कर्डिले अपक्ष म्हणून निवडून आले आणि राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य म्हणून बंदरे व मत्स्य विकास मंत्रीदेखील झाले. 2004 ची निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली अन् ते निवडूनही आले.

दरम्यानच्या काळात नगर शहरात नगरपालिका बरखास्त होऊन 30 जून 2003 रोजी महानगरपालिका अस्तित्वात आली. तोपर्यंत शहराच्या राजकारणात अरुणकाका जगताप, दादाभाऊ कळमकर यांचा वरचष्मा होता. आमदारकी शिवसेनेकडे असली तरी नगरपालिकेची सत्ता प्रदीर्घ काळ अरुण जगताप यांच्याकडेच राहिली. ज्या दिवशी महानगरपालिका झाली त्याच्या आधल्या दिवशी केडगाव ग्रामपंचायतीत सुमारे 300 कामगारांना भरती करून घेण्यात आलं होतं. ही सगळी मंडळी रातोरात महानगरपालिका कर्मचारी म्हणून वर्ग झाले. पुढे न्यायालयात खटला चालला. निकाल मात्र त्यांच्या बाजूने लागला. अशा रीतीने केडगावची दहशत आता नगर शहराच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली होती. शहरात आधीच जगताप गट बलाढ्य होता. त्यात कोतकरांची भर पडली. तालुक्यात शिवाजीराव कर्डिले यांचा बोलबाला होता. आणि शहरात विरोधात शिवसेना आणि अनिल राठोड प्रबळ होते. भाजपची फारशी चलती शहराच्या राजकारणात कधीच नव्हती. 

आ. शिवाजीराव कर्डिले यांना एकूण चार मुली आणि एक मुलगा. त्यापैकी मोठी मुलगी सुवर्णा यांचा विवाह भानुदास कोतकर यांचे चिरंजीव संदीप (माजी महापौर) यांच्याशी झाला. दुसरी कन्या शीतल आणि अरुणकाका जगताप यांचा मुलगा संग्राम जगताप (विद्यमान आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस) हे दोघे 2004-05 मध्ये विवाहबद्ध झाले. तिसरी मुलगी ज्योती यांचा विवाह शिवसेनेचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे पुतणे आणि चंद्रकांत गाडे यांचे चिरंजीव अमोल यांच्याशी, तर चौथी मुलगी कोमल गंगापूरचे वाकडे यांच्या घरात देण्यात आली. मुलगा अक्षय कर्डिले आताच राजकारणात सक्रिय झाला आहे. याच कौटुंबिक श्रुखंलेत भानुदास कोतकर यांची एकुलती एक कन्या सुवर्णा आ. अरुण जगताप यांचे ज्येष्ठ पुत्र आणि आ. संग्राम जगताप यांचे थोरले बंधू जिल्हा परिषदेचे माजी  सदस्य सचिन जगताप यांची पत्नी आहे. त्या नात्याने कोतकर-जगताप हे दोघेही परस्परांचे व्याही झाले आहेत. सुवर्णा सचिन जगताप या राष्ट्रवादीकडून मांडवगण (ता. श्रीगोंदा) गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.अशा रीतीने भानुदास कोतकर, आ. अरुण जगताप आणि शिवाजीराव कर्डिले हे एकमेकांचे व्याही झाले आणि नगरच्या राजकारणाला एकदमच कलाटणी मिळाली. त्यात कोतकर काँग्रेसचे, जगताप राष्ट्रवादीचे आणि कर्डिले भाजपचे, असं नवं एकत्रित समीकरण अस्तित्वात आलं.

पुढे नगरच्या राजकारणात फेरबदल व्हायला सुरुवात झाली. महापालिकेत केडगाव विभागातील 8 नगरसेवक स्थानिक राजकारणात कोतकरांचा दबदबा कायम ठेवण्यास मदत करीत. जगतापांची पर्यायाने राष्ट्रवादीची ताकद होतीच. या दोघांनी मिळून पालिकेत सत्ता स्थापन केली आणि कोतकर पुत्र संदीप नगरचे महापौर झाले. याच दरम्यान शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे याच्या खूनप्रकरणी कोतकर पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तत्पूर्वी, महसूल कर्मचारी शंकर राऊत यांच्याही मुलाचा अशाच पद्धतीने संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्याय मिळविण्यासाठी राऊत झटत होते. त्यातच पुन्हा लांडे प्रकरण घडलं आणि शंकरराव राऊत यांनी हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यर्ंत धसास लावलं. शेवटी याप्रकरणी भानुदास कोतकर, संदीप कोतकर, सचिन कोतकर आणि अमोल कोतकर या चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. दोघेही तुरुंगात गेले. त्याच प्रकरणात साक्षीदार फोडण्याच्या मुद्द्यावरून आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या विरुद्धही गुन्हा दाखल झाला होताच; पण ते त्यातून निर्दोष सुटले.

दरम्यानच्या काळात देशातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचना झाल्या. नगर-नेवासा मतदारसंघ तीन तालुक्यांत विभागला गेला व त्याचे अस्तित्वच लयास गेलं. परिणामी, आ. कर्डिले यांना मतदारसंघ शोधावा लागणार होता. या काळात त्यांनी राष्ट्रवादीकडून भाजपचे खा. दिलीप गांधी यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूकही लढविली होती; परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत. पुढच्या 2009 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राहुरीतून आपलं नशीब आजमायचं ठरविलं, तेव्हा भाजपशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यापुढे नव्हता. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या सहकार्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलं आणि राहुरीतून आमदार म्हणून निवडूनही आले. भाजपमध्ये त्यांचा प्रवेश झाला असला, तरी पक्ष संघटना म्हणून म्हणावं तसं लक्ष त्यांनी दिलं नाही. सगळे पक्ष मात्र त्यांनी चक्‍क खिशात ठेवले होते. महापालिका निवडणुकीत भाजपचे उमेदवार ठरविताना जगताप-कोतकर यांना अडचणीचे ठरतील असे उमेदवार बाद करण्याकडेच त्यांचा कल असायचा आणि त्याचा फटका भाजप-शिवसेना युतीला बसत आला आहे. संदीप कोतकर यांना जन्मठेप झाल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्यामुळे केडगावच्या प्रभाग क्रमांक 32 मध्ये पोटनिवडणूक झाली आणि पुढे हा सगळा रक्‍तरंजित इतिहास घडला.