Wed, May 22, 2019 16:25होमपेज › Ahamadnagar › नगर जिल्ह्यात ‘ब्लॅक फ्रायडे’!

नगर जिल्ह्यात ‘ब्लॅक फ्रायडे’!

Published On: Jun 30 2018 9:47AM | Last Updated: Jun 30 2018 12:11AMनगर : प्रतिनिधी

दोन खून व एकाचा संशयास्पद मृत्यू, अशा तीन गंभीर घटना शुक्रवारी जिल्ह्यात उघडकीस आल्या. त्यामुळे शुक्रवार नगरकरांसाठी ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला. नगर तालुक्यातील अरणगाव शिवारात किरकोळ कारणातून मित्रानेच मित्राचा खून केला. तर राहुरी तालुक्यातील वळण येथे महिलेचा खून करून मृतदेह झुडूपात टाकून देण्यात आला आहे. बोल्हेगाव येथे परप्रांतीयाच्या मृत्यूबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. मात्र, मयताच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस गंभीर दुखापत झाल्याने संशय व्यक्‍त केला जात आहे. 

याबाबत माहिती अशी की, अरणगाव शिवारात राहुल भागवत निमसे (वय 32, रा. टॉवर लाईन दत्त मंदिराजवळ, मोहिनीनगर, केडगाव, मूळ रा. अरणगाव, ता. नगर) यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. याप्रकरणी मयताचा मित्र अमित बाबुराव खामकर (रा. क्रांती चौक, सुतारगल्ली, केडगाव) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला नगर तालुका पोलिसांनी पैठण येथून ताब्यात घेतले आहे.

निमसे व खामकर हे दोघेही व्हीआरडीई येथे सफाई कामगार म्हणून काम करतात. त्यांच्यात अधूनमधून वाद व्हायचे. निमसे यांचा खून झाल्याचे गुरुवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आले. निमसे यांचा खून नेमका का केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आर्थिक व्यवहाराच्या किरकोळ वादातून हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 29) पहाटेच्या सुमारास नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी हे करीत आहेत.

दुसरी खुनाची घटना राहुरी तालुक्यातील वळण शिवारात उघडकीस आली. एका अंदाजे 30-35 वयोगातील अनोळखी महिलेचा मृतदेह राहुरी-मांजरी रस्त्यावरील खिलारी यांच्या शेतातील झुडपात शुक्रवारी सकाळच्या सुमारास आढळून आला. मयत महिलेच्या गळ्याभोवती जखमेचे व्रण आहेत. 

याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन खुनाच्या घटना घडलेल्या असतानाच शुक्रवारी (दि. 29) सकाळीच तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत बोल्हेगाव शिवारात परप्रांतीयाचा मृतदेह आढळून आला. चन्नुलाल सुलतान ठाकूर (वय 60, रा. भवानीनगर चौक, बोल्हेगाव, मूळ रा. जबलपूर) हे मयताचे नाव आहे. मयत अतिमद्यप्राशन करीत होता, असे चौकशीतून पुढे आले आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. प्रथमदर्शनी हा खुनाच्या प्रकार नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस जखम असल्याने संशय व्यक्त केला जात आहे. पुढील तपास तोफखाना पोलिसांकडून सुरू आहे. दोन खून व एक संशयास्पद मृत्यूमुळे शुक्रवार नगरकरांसाठी ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला.