Wed, Apr 24, 2019 15:30होमपेज › Ahamadnagar › खेडला वाढतेय पशुपक्ष्यांची वसाहत 

खेडला वाढतेय पशुपक्ष्यांची वसाहत 

Published On: Apr 13 2018 1:12AM | Last Updated: Apr 13 2018 1:12AMखेड : विजय सोनवणे 

खेडचा निसर्गरम्य परिसर, बाराही महिने गावाच्या पायथ्याशी वाहत असलेली भीमा नदी, त्यामुळे बाराही महिने येथे असलेली हिरवळ पशु-पक्ष्यांची वसाहत वाढण्यास पुरक ठरत आहे. तसेच पर्यटक व छायाचित्रकारांना हे गाव आकर्षित करत आहे. 

इ.स.वी. सन 1707 साली खेड येथे महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू राजे यांच्यात झालेली ऐतिहासिक लढाई प्रसिद्ध आहे. या लढाईत शाहू राजांचा विजय झाला होता. भीमा नदीच्या तीरावर वसलेले खेड हे गाव हिरवळीने नटलेले आहे. त्यामुळे या परिसरात विविध जातीच्या पशुपक्ष्यांची मोठी रेलचेल दिसून येते. नदी काठच्या परिसरात चित्रबलाक, रोहित, कंठेरी, चिखल्या, तपकिरी डोक्याचा कुरव, उघडचोच करकोचा, मुग्धबलाक, थापट्या, राखी बगळा, गरुड, घुबड, रंगीबेरंगी पोपटांसह देशी-विदेशी पक्ष्यांबरोबरच हरीण, काळवीट, ससे, अशा विविध वन्यप्राण्यांचे दर्शन  होते. त्यामुळे हे विहंगमय दृष्य टिपण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात.

बारामती येथील निसर्गप्रेमी श्रीनिवास पवार, प्रवीण जगताप या निसर्गप्रेमींनी भेट देवून या भागातील पशुपक्ष्यांचे निरीक्षण केले. या निरीक्षणात पक्ष्यांच्या अनेक जाती आढळून आल्या आहेत. एरव्ही चिमणी आणि कावळा दिसून येणार्‍या या परिसरात पशुपक्ष्यांच्या असंख्य जाती पहावयास मिळत आहेत.तीन जिल्ह्यांची सीमारेषा असलेल्या  भीमा नदीपात्रात मुबलक पाणीसाठा असल्याने विविध जातीच्या परदेशी पक्ष्यांची गर्दी येथे होते. तसेच या भागाचे सौंदर्य छायाचित्रकारांसाठी, पर्यटकांसाठी पर्वणीच असल्याचे मत निसर्गप्रेमी श्रीनिवास पवार, प्रविण जगताप यांनी व्यक्त केले.

Tags : Ahmanadgar, Birds, come, towards, Khed