Thu, Jun 27, 2019 01:44होमपेज › Ahamadnagar › स्वच्छतेच्या नावाखाली बिले काढली

स्वच्छतेच्या नावाखाली बिले काढली

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 12:34AMकोपरगाव : प्रतिनिधी

स्वच्छ भारत सर्वेक्षण 2018 अंतर्गत कोपरगाव पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी राज्य सरकारची शुद्ध फसवणूक केली आहे. हजारो रुपयांची बिले त्या माध्यमातून काढली आहेत. पालिकेच्या मनई भागात असलेल्या कचरा डेपोत  कंपोस्ट खत तयार केले जाते, असा  डिजिटल फलक लावून दिशाभूल चालवली असल्याचा आरोप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला. 

नगराध्यक्ष वहाडणे यांनी ‘ऑन दि स्पॉट’ भेट दिली असता, या ठिकाणी कोणतेही खत बनविले जात नसल्याचे निदर्शनास आले. तसेच ओला व सुक्या कचर्‍यासाठी बांधलेल्या शेडमध्ये कुठलाही कचरा वर्गीकरण केले जात नसल्याचे समोर आले. या सर्व कामांचा केवळ प्रसिद्धीचा स्टंट करणार्‍या मुख्याधिकारी शिल्पा दरेकर या प्रत्यक्षपणे कागदावरच हे अभियान राबवित आहेत. याबाबत तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे  करणार असल्याचे नगराध्यक्ष वहाडणे यांनी सांगितले.

स्वच्छ भारत सर्वेक्षणांतर्गत शहरात मोठे फलक लावण्यात आले असून, कचरा गोळा करणार्‍या घंटागाड्यांवर ध्वनिक्षेपक व डिजिटल फलक लाऊन त्याद्वारे नागरिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु कचरा डेपोत मात्र अशी कोणतीही व्यवस्था नसल्याचे दिसून आले आहे. कोपरगाव पालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांचे  या सर्वेक्षणाचे प्रबोधन करण्यासाठी 42 लाख रुपयांचा ठेका देखील देण्यात आला आहे. त्याबाबतही सत्ताधारी व विरोधकांत आरोप-प्रत्यारोप झाले, असे वहाडणे यांनी सांगून मुख्याधिकारी दरेकर यांनी धारणगाव रस्ता, पालिका कॉर्नर  या ठिकाणी छोटे बागबगीचे तयार करून त्याची  प्रसिद्धीसाठी व प्रमोशनसाठी  पेपरबाजी केली. 

शहरात 7 प्रभाग असून मुख्य रस्ता व काही ठराविक ठिकाणीच स्वच्छता करण्यात येते. मात्र, शहराचे अंतरंगाचे चित्र मात्र वेगळेच आहे. कचरा डेपोत उभारण्यात आलेले शेड म्हणजे केवळ ठेकेदारानाचे टक्केवारीसाठी बिले काढण्यासाठी आहेत. शहरात संजयनगर भागातून कत्तलखान्याच्या माध्यमातून रक्ताचे पाटचे पाट वाहत आहेत. मुख्याधिकार्‍यांना ही घाण दिसत नाही का? त्यावर कुठली ठाम भूमिका त्या घेत का नाही. कुठल्या न कुठल्या माध्यमातून शहर विकासाची कामे सुरू केले की त्यात खोडा घालण्याचे काम दरेकर करतात. त्यामुळे सर्व रोष नगराध्यक्ष कुठलेही काम करीत नाही हा आमच्या माथी मारला जात आहे. 

मुख्याधिकारी दरेकर या पालिका व पोलिस प्रशासन व नगराध्यक्ष यांची मदत घेऊन सदरचे कत्तलखाने कायमचे हटविण्यासाठी प्रयत्न का करीत नाहीत?, शहर विकासासाठी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, प्रशासन  यांच्यात समन्वय असावा, म्हणून मी एक पाऊल मागे घेतले आहे.आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यात शहरातील सर्व प्रभागांतील  लिकेज झालेल्या जलवाहिन्या दुरुस्तीचे आदेश दिले होते, तेही त्यांनी पूर्ण केले नाही. दरेकर शहराच्या विकासासाठी आहेत की स्वतःच्या विकासासाठी? असा सवालही वहाडणे यांनी केला.