Mon, Mar 25, 2019 13:14होमपेज › Ahamadnagar › जिरवाजिरवीच्या राजकारणात बडी अतिक्रमणे ‘जैसे थे’!

जिरवाजिरवीच्या राजकारणात बडी अतिक्रमणे ‘जैसे थे’!

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 08 2018 10:04PMश्रीगोंदा : अमोल गव्हाणे

अतिक्रमणाच्या मुद्द्यावर बड्या, बड्या गप्पा मारणार्‍या नगरपालिका प्रशासनाने आयत्यावेळी कचखाऊ भूमिका घेतल्याने रस्त्यालगतची अतिक्रमण काढणे हा एक फक्त फार्स झाला आणि नगरपालिकेचे चांगलेच हसू झाले. अतिक्रमण काढण्याची मोठी संधी असताना सुंदोपसुंदीच्या राजकारणात ही संधी गमावली गेली. श्रीगोंदा नगरपालिकेची पुढील वर्षी निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. बहुचर्चित सतरा रस्त्यांची कामे मोठ्या विलंबानंतर सुरू झाली.त्यात सिद्धार्थनगर ते सरस्वतीनदी दरम्यानचा रस्ता मंजूर झाला. हा रस्ता मुख्य रस्ता असून रस्त्याच्या दुतर्फा मोठी अतिक्रमण असल्याने पालिका प्रशासनाने हा रस्ता मागे ठेवला होता.  गेल्या महिनाभरापासून या रस्त्याच्या बाजूची अतिक्रमण काढण्याबाबत चर्चा सुरू होती. अतिक्रमण काढण्याबाबत तारीख निश्चित झाली. शहरात माहिती प्रसारित करण्यात आली. त्यानुसार मागीलआठवड्यात 3 जुलैचा दिवस ठरविण्यात आला. पालिका प्रशासनाने संभाव्य वाद लक्षात घेऊन श्रीगोंदा पोलिसांकडे बंदोबस्त मागितला होता. त्याचबरोबर पालिकेने पोलिस बंदोबस्तासाठी लागणारी रक्कम पोलिस ठाण्यात जमा केली. 

पण त्याच दरम्यान अतिक्रमण कशा पद्धतीने काढायचे यावर नगरपालिकेत चर्चा सुरू असताना विरोधकांनी व काही कार्यकर्त्यांनी  आपली भूमिका मांडली पण बैठकीत कुठल्याही प्रकारची निर्णय होत नव्हता. रस्त्याचे सीमांकन झाले नसताना अतिक्रमण कसे काढणार या मुद्द्यावर पालिका प्रशासन हतबल झाले.आणि खर्‍या अर्थाने अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेची धार बोधट झाली.अतिक्रमण काढायचे की नाही अशीही परिस्थिती निर्माण झाली.पोलिस बंदोबस्तासाठी भरलेले पैसे परत मिळणार नसल्याने रस्त्याच्या बाजूची आवश्यक असणारे अतिक्रमण काढण्यावर एकमत झाले आणि दुपारी तीन वाजता अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. तोपर्यत टपरीधारकांनी आपापल्या टपर्‍या मागे हटवून घेतल्या होत्या.

नगरपालिकेने दोन ते तीन तास जेसीबी चालवून रस्त्याच्या कामात अडसर येणारी अतिक्रमण बाजूला केली. नगरपालिकेने मोठा गाजावाजा करून अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली मात्र प्रत्यक्ष अतिक्रमण काढताना कचखाऊ भूमिका घेतल्याने शहरवासियांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. मुळात नगरपालिका प्रशासनाने एवढा मोठा गाजावाजा करत असताना अतिक्रमणाबाबतची नियमावलीचा अभ्यास करणे आवश्यक होते मात्र तसे न केल्याने अतिक्रमणाची मोहीम एकप्रकारे अंगलट आली असेच म्हणावे लागेल. अतिक्रमण हटविण्याची ही मोठी संधी होती अन् अशी संधी परत परत येत नसते. याची जाणीव असतानाही पालिकेने योग्य नियोजन न केल्याने अतिक्रमण हटाव मोहीम एक फार्स ठरला.काम पूर्ण होइपर्यंत ही अतिक्रमण हटतील पण काम झाल्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होणार असून ते अतिक्रमण हटवता हटवता पालिका प्रशासनाच्या नाकीनाऊ येणार आहे. राजकीय सुंदोपसुंदीमध्ये शहराचा श्वास मोकळा होण्याऐवजी तो अडकून पडला असेच म्हणावे लागेल. 

अंतर्गत गटबाजीचा फटका 

नगरपालिकेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे. अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यामुळे पालिकेत विरोधक आणि सत्ताधारी गटामध्ये  सगळे काही आलबेल आहे असे अजिबात नाही. त्यातच अतिक्रमण हटविण्याच्या मुद्द्यावर नगरसेवकांना विश्वासात घेतले गेले नसल्याने साहजिकच त्याचा फटका अतिक्रमण काढताना बसला असल्याचे बोलले जात आहे. ही गटबाजी शहराच्या विकासात आडवी येत असेल तर ती काय कामाची असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

शनीचौक परिसरातील अतिक्रमणाचे काय ? 

33 कोटी रुपयांची 17 रस्त्यांची कामे जवळपास अंतिम टप्प्यात आहेत. जोधपूर मारुती चौक ते बायपास रस्त्याचे काम जवळपास झाले आहे. मात्र, या रस्त्यावरील उर्वरित अतिक्रमण काढण्यासाठी पालिका कुठल्या मुहूर्ताची वाट पाहत आहे हे शहरवासियांना पडलेले एक कोडे आहे.