Thu, May 23, 2019 20:24
    ब्रेकिंग    होमपेज › Ahamadnagar › ‘महसूल’ची भूमिका बोटचेपी

‘महसूल’ची भूमिका बोटचेपी

Published On: Jun 11 2018 1:05AM | Last Updated: Jun 10 2018 11:16PMनगर : प्रतिनिधी

भिंगार नाला गाळपेर जमीनीची विक्री केल्याप्रकरणी महसूल विभागाने प्राथमिक चौकशी करून 5 पानांची सविस्तर फिर्याद दिलेली आहे. त्यात सकृतदर्शनी दोषींची नावेही आहेत. तरीही गुन्ह्यात आरोपी म्हणून अज्ञात असा उल्लेख केलेला आहे. वरिष्ठांच्या आदेशावरून तशी फिर्याद दिल्याचे मंडलाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. चौकशी केल्यानंतरही आरोपी अज्ञात असल्याचा दावा करणे, ही महसूल विभागाची बोटचेपी भूमिका संशयास्पद वाटते.

बनावट दस्ताऐवज, कागदपत्रे तयार करून सन 1966 पासून शासनाच्या मालकीची गाळपेर जमीन लाटण्यात आली आहे. या कोट्यवधी रुपयांचा जमीन खरेदी घोटाळा अनेक वर्षांपासून सुरू होता. सदर गाळपेर जमीन अकृषिक करण्याचाही प्रतापही करण्यात आलेला आहे. लोकायुक्तांच्या आदेशानंतर जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी केली. त्या चौकशी अहवालानुसार दिलेल्या फिर्यादीत प्रथमदर्शनी दोषी असलेल्यांची नावे नमूद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे सदर व्यक्तींचा उल्लेख गुन्ह्यात प्रथम खबरी अहवालात (एफआयआर) आरोपी म्हणून करणे आवश्यक होते. प्रथम खबरी अहवाल हा घटनेची प्राथमिक माहिती देतो. त्या खबरी अहवालावर चौकशी करून तपासी अधिकारी पुरावे असलेल्या आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करतात. त्यामुळे साहजिकच सकृतदर्शनी दोषींचा ‘एफआयआर’ मध्ये आरोपी म्हणून उल्लेख करणे आवश्यक आहे. सकृतदर्शनी दोषी असलेल्यांविरुद्ध पुरावे न आढळल्यास त्यांची नावे आरोपी म्हणून वगळली जातात.  

आरोपी म्हणून अज्ञात व्यक्ती असा उल्लेख करायचा होता, तर चौकशी करून कोणा-कोणाचा दोष आहे, हे नमूद करण्याची काय आवश्यकता होती? चौकशी करून जर ‘एफआयआर’ द्यायची होती, तर आरोपींची नावे नमूद करणे आवश्यक आहे. आरोपी म्हणून उल्लेख केला म्हणून थेट त्याला शिक्षा होते, असे नाही. त्यांच्याबाबत पुरावे आढळले, तर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होते. फिर्यादीत आरोपी म्हणून उल्लेख नसला, तरी कोणाचा दोष आढळल्यास त्याला गुन्ह्यात आरोपी करणे हा तपासी अधिकार्‍याचा कायदेशीर अधिकार आहे. ही प्रक्रिया इतकी साधी सरळ असतानाही महसूल विभागाने गाळपेर जमीन विक्री घोटाळा प्रकरणात अशी भूमिका घेतलीच कशी, असा प्रश्‍न उपस्थित होतो. हा प्रकार खरेच कायद्याचे अज्ञान दाखविणारे आहे की पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तीर मारण्याचा आहे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.