Sun, Oct 20, 2019 02:03होमपेज › Ahamadnagar › भानुदास कोतकर येरवड्यातून ताब्यात

भानुदास कोतकर येरवड्यातून ताब्यात

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 15 2018 1:32AMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडात स्टँडिंग वॉरंट जारी केलेल्या भानुदास कोतकर याला सहाय्यक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या पथकाने काल (दि. 14) सकाळी येरवडा परिसरातून ताब्यात घेतले. येरवडा पोलिस ठाण्यात हजेरीसाठी जाण्याअगोदरच काही अंतरावर तो नगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांचे पथक भानुदास कोतकर याला घेऊन नगरला आले. विशेष तपास पथकाने प्रमुख अपर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार व गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी कोतकर याची सोमवारी दुपारी सुमारे तासभर कसून चौकशी केली. 

रवि खोल्लम याला मयत संजय कोतकर यांनी फोनवरून शिवीगाळ केल्यानंतर खोल्लम याने हा प्रकार नगरसेवक विशाल कोतकर याला ऐकविला होता. फोनचे कॉल रेकॉर्डिंग सुवर्णा कोतकर यांना ऐकविल्यानंतर, त्यांचे भानुदास कोतकर याच्याशी फोनवरून बोलणे झाले होते. त्यानंतर संदीप गुंजाळ याला विशाल कोतकरचा फोन झाला व केडगावचे दुहेरी हत्याकांड घडले. खुनापूर्वी भानुदास कोतकर याचे सुनेशी नेमके काय बोलणे झाले, याचा तपास करण्यासाठी पोलिसांना कोतकर याला अटक करायची होती. त्याच्याविरुद्ध न्यायालयाने स्टँडिंग वॉरंटही जारी केले होते. तसेच केडगाव हत्याकांडातील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी मयत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. 

भानुदास कोतकर हा लांडे खूनप्रकरणात जन्मठेपेच्या शिक्षेत जामिनावर असून, त्याला पोलिस ठाण्यात हजेरीची अट आहे. अनेक दिवसांपासून तो कुठेही हजेरीसाठी गेलेला नव्हता. सोमवारी सकाळी तो येरवडा पोलिस ठाण्यात हजेरीला येणार असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांना खबर्‍याकडून समजली होती. त्यांनी त्यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक आर. डी. पवार, कर्मचारी अरविंद भिंगारदिवे, महेश आव्हाड यांना तात्काळ येरवडा येथे जाण्यास सांगून कोतकर यास अटक करण्याचे आदेश दिले. कलवानिया यांचे पथक सकाळी लवकरच पुण्यातील येरवड्यात दाखल झाले होते. येरवडा परिसरातच नगर पोलिसांचे पथक सापळा रचून होते. येरवडा पोलिस ठाण्यापासून बर्‍याच अंतरावर नगर पोलिसांच्या जाळ्यात भानुदास कोतकर अडकला. त्याला ताब्यात घेऊन पोलिस पथक नगरला रवाना झाले. नगरला विशेष तपास पथकाने त्याची कसून चौकशी केली. त्यातून नेमकी कोणती माहिती हाती लागली, याचा तपशील समजू शकला नाही.