Mon, Mar 25, 2019 13:14होमपेज › Ahamadnagar › टेल टँक तुडूंब; पाणीप्रश्‍न मिटला

टेल टँक तुडूंब; पाणीप्रश्‍न मिटला

Published On: Aug 30 2018 1:15AM | Last Updated: Aug 29 2018 11:22PMटाकळीभान : वार्ताहर

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानसह परिसरातील गावांना वरदान ठरलेला टाकळीभान साठवण तलाव भंडारदरा धरणाच्या शेती आवर्तन व ओव्हरफ्लोच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरल्याने टाकळीभानसह परिसरातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सन 1972 च्या दुष्काळात या तलावाची निर्मिती झाली असून स्व. गोविंदराव आदिक कृषिमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नांमुळे या तलावाचे काम झाले आहे. त्यामुळे तलावाला ‘गोविंद सागर’ या नावाने संबोधले जाते. 197.18 दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या  तलावाचे 194.14 दशलक्ष घनफूट पाणी वापरात येते व उर्वरित पाणी मृृृतसाठा असतो.

तलावाचे पाणी 16 नंबर चारीने दिले जाते ते पाणी टाकळीभान, घोगरगाव, बेलपिंपळगावच्या काही भागात पोहोचते. निळवंडे धरणाच्या निर्मितीपूर्वी टाकळीभान तलाव दरवर्षी भंडारदरा धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून भरला जात होता. मात्र, निळवंडे धरणाच्या निर्मितीनंतर भंडारदरा धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी निळवंडे धरणात अडविले जाते. त्यामुळे आता तलाव शेती आवर्तनाच्या, पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून व सोडण्यात आलेल्या ओव्हरफ्लोच्या आवर्तनातून भरला जात आहे. 

या वर्षी धरणाच्या लाभक्षेत्रात दमदार पाऊस झाला असून भंडारदरा, निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे व सध्याही पाऊस सुरू असल्याने ओव्हर फ्लोचे पाणी शेती आवर्तन सुरू असल्याने या पाण्यातून तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

तलावाच्या पाण्याचा पाझर टाकळीभान, भोकर, गुजरवाडी, खिर्डी, कारवाडी, कारेगाव आदी परिसरात होत असल्याने तलावाचा शेतकर्‍यांना मोठा फायदा झाला आहे. तलावाच्या परिसरात टाकळीभानसह परिसरातील गावांच्या पाणीपुरवठा योजना असून टाकळीभानच्या पाणीयोजनेच्या दोन विहिरी या परिसरात असल्याने जोपर्यंत तलावात पाणीसाठा असतो तोपर्यंत या विहिरींना मुबलक पाणी असते. त्यामुळे टाकळीभानला शक्यतो पाणीटंचाई जाणवत नाही. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. तलाव भरण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अभियंता अहिलाजी खैरे, कालवा निरीक्षक बाळासाहेब जपे, शेळके, बाळासाहेब कोकणे, कान्हा खंडागळे मित्रमंडळाने परिश्रम घेतले.