Sat, Mar 23, 2019 18:35होमपेज › Ahamadnagar › भंडारदरा पाणलोट परिसरात धुवाँधार! 

भंडारदरा पाणलोट परिसरात धुवाँधार! 

Published On: Jun 27 2018 1:19AM | Last Updated: Jun 27 2018 12:30AMभंडारदरा : वार्ताहर

पावसाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मान्सूनचे धमाकेदार आगमन झाले आहे. सोमवारी व मंगळवारी हा पाऊस सर्वदूर सुरू होता तर रतनवाडी येथे 24 तासांत तब्बल 14 इंच धो-धो पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मागील वर्षी पावसाचे वेळेवर आगमन झाले होते. सगळीकडेच पावसाने हाहाकार माजवला होता. परिणामी, भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या जुलै महिन्यात भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले होते. त्यामुळे शेतकर्‍यांच्या चिंता मिटल्या होत्या. 

यंदा भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बरोबर 7 जून रोजी वरुणराजा बरसल्यानंतर 15 ते 20 दिवस पाऊस गायब झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सोमवारपासून पावसाने हळूवार सुरुवात करीत मध्यरात्री रौद्ररूप धारण करून रतनवाडीत तब्बल 14 इंच म्हणजेच 355 मी. मी. सर्वाधिक पर्जन्यवृष्टी केली.

याशिवाय पांजरे 221 मि.मी.घाटघर 105 मि. मी., वाकी 135 मि. मी. तर भंडारदरा 187 मि.मी.इतका पाऊस पडल्याने परिसरातील डोंगरदर्‍यातून पाण्याचे लोंढे भंडारदरा धरणाच्या दिशेने आगेकूच करत आहेत. 24 तासांत धरणात 221 दलघफूटपाण्याची आवक देखील झाली आहे. या पावसाने आदिवासी शेतकरी बांधवांनी पेरलेली भाताची रोपे पुन्हा तरारून हिरवीगार दिसू लागली असून आवणींच्या कामाला सुरूवात होणार आहे.वातावरणात गारवा निर्माण झाला असून परिसरातील धबधबे फेसाळून वाहते झाल्याने पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. डोंगरदर्‍याने हिरवागार शालू परिधान करून घाटघर परिसर धुक्यात हरवल्याने निसर्गसौंदर्य फुलले आहे.

भंडारदरा धरणातून 788 क्यूसेक तर निळवंडेतून 1000 क्यूसेकने विसर्ग सुरू असून भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 3474  दलघनफूट, तर निळवंडेत 663 दशलक्ष घनफूट इतका झाला आहे.

दरम्यान, काल सायंकाळीही  भंडारदरा पाणलोटात पावसाची रिपरिप सुरूच होती. धरणातील आवकही वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. त्यामुळे काल 12 तासामध्ये भंडारदरा धरणात नव्याने 519 दलघफू पाणी नव्याने आले आहे. याशिवाय  दि. 1 ते 26 जुन या कालावधीत 1540 दलघफू इतके पाणी धरणामध्ये आले आहे.