Wed, Jul 17, 2019 15:59होमपेज › Ahamadnagar › धक्काबुक्की करणार्‍या कार्यकर्त्यांना अटक  

धक्काबुक्की करणार्‍या कार्यकर्त्यांना अटक  

Published On: May 04 2018 1:54AM | Last Updated: May 03 2018 11:35PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांच्या रसाळ वाणीतून येथील थत्ते ग्राऊंडवर तुळजा फाउंडेशनच्यावतीने भागवत सप्ताहास सुरूवात झाली आहे. त्यानिमित्त दि. 2 मे. रोजी सायंकाळी मिरवणुकीचेे आयोजन करण्यात आले होते. त्यात आ. भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, पंचायत समितीचे सभापती दीपकराव पटारे हे महाराजांना पुष्पहार घालण्यासाठी गेले असता, त्यांना ससाणेंच्या कार्यकर्त्यांनी मज्जाव करून धक्काबुक्कीस सुरूवात केली. आ. कांबळे यांचा बचाव करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की झाली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी पोलिसांनी आयोजकांच्या (ससाणे समर्थक) 11 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

सागर धर्मराज धुपाटे, अजय विजय छल्लारे, अजय चांगदेव धाकतोडे, निलेश सुभाष बोरावके, कष्णा सोमनाथ पुंड, निलेश जगन्नाथ नागले, युवराज बाळासाहेब फंड, गोपाळ वसंतराव लिंगायत, निलेश हिरालाल कुंकूलोळ, सुरेश देवराम धोत्रे असे आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पो. कॉ. सतीश गोरे यांनी पोलिसात फिर्याद दिली. 

उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या अधिपत्याखाली महंत रामगिरी महाराज यांच्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक राममंदिर चौकात आली असता, आ. कांबळे व त्यांचे सहकारी महंत रामगिरी महाराज यांना पुष्पहार घालण्यासाठी गेले असता, त्यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मज्जाव केला. त्यानंतर हे सर्व कार्यकर्ते नगरपालिकेत जमा झाले. यानंतर बराचवेळ फोनाफानी झाली. त्यानंतर रात्रीच कांबळे, आदिक समर्थकांनी पोलिस ठाणे गाठले. या ठिकाणी पोलिस निरीक्षकांशी चर्चा झाली. याच दरम्यान अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार व पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे हे शहर पोलिस ठाण्यात आले. दीर्घ चर्चेनंतर आ. कांबळे तसेच त्यांच्या समवेत असणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची बाब काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कळताच ते रात्रीच पोलिस ठाण्यात आले. त्यामुळे मध्यरात्रीच्यावेळी पोलिस ठाण्यात यात्रा भरली होती.

सकाळी ही बाब गावागावांत पसरल्याने ससाणे समर्थकांनी पोलिस ठाण्यात एकच गर्दी केली होती. बाजार समितीचे सभापती सचिन गुजर, सुधीर नवले, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, करण ससाणे हे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांच्या दालनात सकाळपासून ठाण मांडून होते. परंतु रात्रीच गुन्हा दाखल झाल्याने त्यांचा नाईलाज झाला होता. या सर्व आरोपींना दुपारी न्यायालयात न्यायाधीश एम. व्ही. चव्हाण यांच्यासमोर उभे केले असता त्यांनी प्रत्येक आरोपीला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला. आरोपींच्यावतीने प्रमोद वलटे यांनी काम पाहिले. 

दरम्यान, भागवत सप्ताहनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहात निमित्त कुठलेही फलक न लावण्याचा निर्णय आयोजकांच्यावतीने घेण्यात आला होता. परंतु आ. कांबळे, अनुराधा आदिक यांचे रामगिरी महाराजांच्या स्वागताचे फलक रातोरात लागले गेले. त्यामुळे ससाणे समर्थकांमध्ये चलबिचल सुरू होती.  त्याचेच वादात रूपांतर झाले.या मिरवणुकीचे पोलिसांकडूनही व्हिडिओ शूटिंग काढण्यात आले आहे. या शूटिंगमध्ये नेमके काय घडले आहे, याचा उलगडा होणार आहे. धार्मिक कार्यक्रमात राजकारण  झाल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली. 

कारेगावातील पोरांनी दारू पिऊन धिंगाणा घातला

महंत रामगिरी महाराजांची मिरवणूक सुरळीत सुरू होती. परंतु या शोभायात्रेस गालबोट लावण्यासाठी कारेगाव येथील काही तरूण दारू पिऊन राममंदिर चौकात उभे होते. या ठिकाणी मिरवणुक आली असता त्यांनी धिंगाणा घालण्यास सुरूवात केली. हा त्यांचा प्रि-प्लॅनिंग होता. सध्या आमचा कार्यक्रम सुरू असल्याने आम्ही कोणाही विरूध्द तक्रार करणार नसल्याचे बाजार समितीचे सभापती सचिन गुजर यांनी सांगितले. 

पोलिसांनीच मागितली न्यायालयीन कोठडी

काल सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 11 आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी तपासी अधिकार्‍यांनीच न्यायालयाकडे आरोपींविरूध्द न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यामुळे न्यायाधिशांनी काहीवेळ निकाल राखीव ठेवला. त्यानंतर आरोपींच्या जामिनावर सुनावणी होऊन त्यांना न्यायालयीन कोठडी देत जामीन मंजूर करण्यात आला. 

आमदारास धक्काबुक्की निंदनीय बाब

महंत रामगिरी महाराज, तसेच सरला बेटाशी आमचे भावनिक संबंध आहेत. महाराजांचे आगमन होणार असल्याने स्वच्छ हेतूने आपण त्यांचे स्वागत करण्यासाठी गेलो होतो. परंतु ससाणे समर्थकांनी आपणास धक्का बुक्की केली. महाराजांनी या कार्यकर्त्यांना थांबण्याचा इशारा केला. परंतु कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडेही कानाडोळा करीत रथ पुढे नेला. ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचे आ. कांबळे यांनी सांगितले.