Mon, May 27, 2019 09:33होमपेज › Ahamadnagar › संगमनेरात ‘बेटी बचाव’ चिंताजनक

संगमनेरात ‘बेटी बचाव’ चिंताजनक

Published On: Apr 29 2018 2:10AM | Last Updated: Apr 28 2018 11:05PM- गोरक्षनाथ नेहे, संगमनेर

संगमनेर तालुक्यात गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत मुलींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटत असल्यामुळे आजही तालुक्यात वंशाला ‘दिवा’च हवा, ‘पणती’ नको असेच काहीसे चिंताजनक चित्र दिसत आहे. सरकारच्या ‘बेटी बचाव बेटी  पढाव’ या उपक्रमासह  इतरही उपक्रमांगद्वारे येथे सामाजिक प्रबोधन करण्याची मोठी जबाबदारी संगमनेरकरांवर येवून ठेपली आहे.

संगमनेर तालुक्यात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण वाढले पाहिजे, यासाठी संगमनेर तालुक्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणार्‍या उपकेंद्रातून स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भात तज्ज्ञांचे व्याख्याने आरोग्य विभागाच्या वतीने  प्रत्येक वर्षी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ यावर आधारित कलापथकाद्वारे प्रबोधन, महिला मंडळ, आरोग्य व अंगणवाडी सेविका, आशा सेविकांच्या माध्यमातून महिलांमध्ये  प्रबोधन केले जाते. तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्यकेंद्रात मुलीच्या जन्माचे स्वागत आदी उपक्रम राबवून महिलांमध्ये प्रबोधन  केले जाते. मात्र ते फक्त कागदावरच दाखविले जाते. मुलींचे प्रमाण वाढण्याऐवजी कमीच होत असल्याचे पाच वर्षातील आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे. 

तालुक्यात व शहरात असणार्‍या सोनोग्राफी केंद्रात सोनोग्राफीत लिंग निवड चाचणीस प्रतिबंध केला गेला तसेच स्त्रीभ्रूण हत्येचा कायदाही कडक करण्यात आला आणि त्या कायद्याअंतर्गत कठोरात कठोर शिक्षेची तरतूदसुद्धा करण्यात आली   असतानाही तालुक्यात मुलींच्या पेक्षा मुलांचे प्रमाण वाढतच का चालले आहे, याचे चिंतन करण्याची गरज आहे. वंशाला दिवा नको तर आमच्या वंशाला पणतीच हवी, अशी समाजाची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत कितीही प्रबोधन केले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही.  

संगमनेर तालुक्यात पाच वर्षांच्या कालावधी मुलींचा जन्मदर कमी झाला. त्यात सन 2013 मध्ये  मुलांची संख्या 4611 तर मुलींची संख्या 4303 होती व त्याचे प्रमाण  933 राहिले. सन 2014 मध्ये  मुलांची संख्या 4611 तर मुलींची संख्या 4303 व याचे प्रमाण 933 होते. त्यानंतर सन 2015  मध्ये  मुलांची संख्या 4970 तर मुलींची संख्या 4587 होऊन हे प्रमाण काहीसे घटून ते 923 झाले. पुढे 2016 मध्ये  मुलांची संख्या 3997 तर मुलींची संख्या 3708 असे येवून त्याचे प्रमाण 928 हे वाढले. मात्रस सन 2017 मध्ये मुलांची संख्या 3345 तर मुलीची संख्या 2957 झाल्याने मुलींचा जन्मदर हजार मुलांमागे 884 इतका पुन्हा घसरल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच 2018 मध्ये तीन महिन्यात हे प्रमाण 858 आल्याने आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे मुलींचा जन्मदर वाढवणे हे मोठे आव्हान असणार आहे. 

मानसिकता बदलणे गरजेचे : डॉ घोलप

तालुक्याच्या ग्रामीण भागात पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या  वतीने तालुक्यात अनेक योजनांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम दहाही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या व उपकेंद्राच्या माध्यमातून मनापासून केले जाते मात्र नुसते प्रबोधन न करता समाजाची  खर्‍याअर्थाने मानसिकता बदलणे  काळाची गरज असल्याचे मत संगमनेर पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले.