Tue, Oct 22, 2019 02:07होमपेज › Ahamadnagar › गरिबांचीही शिजणार आता तूर डाळ!

गरिबांचीही शिजणार आता तूर डाळ!

Published On: Dec 09 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 11:07PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

राज्य सरकारने सवलतीच्या दरात स्वस्तधान्य दुकानांत तूरडाळ उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्वच स्तरातील शिधापत्रिकाधारकांना महागाईच्या काळात दिलासा मिळणार आहे. त्यासाठी मात्र प्रतिकिलो 55 रुपये अदा करावे लागणार आहेत. बाजारभावापेक्षा जवळपास 25 ते 30 रुपये कमी दराने तूरडाळ  मिळणार असल्यामुळे घरोघरी वरण, आमटी शिजणार आहे. पहिल्या टप्प्यात अंत्योदय आणि प्राधान्य कुंटुब योजनेतील लाभार्थींना 15 डिसेंबरपासून एक किलो तूरडाळ मिळणार आहे.

सरकारमार्फत बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीची भरडाई केल्यानंतर तूरडाळीची विक्री राज्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानातून होणार आहे. सर्वच शिधापत्रिकाधारकांना प्रतिक्‍विंटल 55 रुपये दराने मागणीप्रमाणे उपलब्ध करावी, असे निर्देश सरकारने जिल्हा पुरवठाा विभागाला दिले आहेत.पुणे, मुंबई, ठाणे, सोलापूर आदी जिल्ह्यांत वाटप सुरु देखील झाले आहे.

बाजारपेठेत तूरडाळीचा दर प्रतिकिलो शंभर रुपयांच्या आसपास आहे. गोरगरिब जनतेला सध्याच्या महागाईच्या काळात ही डाळ घेणे परवडत नाही.त्यामुळे त्यांच्या ताटातील वरण सध्या पातळच आहे. या डाळीची आमटी,ऊसळ आदी प्रकार दिवसेंदिवस दुरापास्त झाले आहेत. हीच परिस्थिती मध्यमवर्गीय कुटुंबांची देखील आहे. हॉटेल, घरगुती खाणावळ तसेच मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये देखील तूरडाळीचा वापर सहसा केला जात नाही.

ही डाळ आता स्वस्त धान्य दुकानांतून सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहे. अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, अन्‍नपूर्णा, एपीएल व्हॉईट तसेच शुभ्र शिधापत्रिकाधारकांना देखील 55 रुपये दराने ही डाळ मिळणार आहे.आजमितीस शासनाकडे डाळ कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्हाभरातील फक्‍त अंत्योदय व प्राधान्य कुंटुब योजनेतील लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड एक किलो डाळ वाटप केली जाणार आहे.

त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने जिल्हा पणन अधिकारी यांच्याकडे 7 हजार 112 क्‍विंटल तूरडाळीची मागणी केली आहे. येत्या आठ दिवसांत ही डाळ उपलब्ध होणार असून, 15 डिसेंबरपासून लाबार्थींना वाटप केली जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांनी सांगितले.

पावणेसात लाख कार्डधारकांना लाभ

पहिल्या टप्प्यात अंत्योदय योजनेतील 75 हजार 325 व प्राधान्य कुंटुब योजनेतील 6 लाख 18 हजार 76 असे एकूण 6 लाख 93 हजार 401 कार्डधारकांना एक किलो तूरडाळ 55 रुपये दराने वाटप केली जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात उर्वरित सर्वच 10 लाख 60 हजार शिधापत्रिकाधारकांना ही डाळ उपलब्ध केली जाणार आहे. सरकारकडून मोठ्या प्रमाणात डाळीचा पुरवठा झाल्यास कार्डधारकांना हवी तेवढी डाळ सवलतीच्या दरातच उपलब्ध होणार आहे.