होमपेज › Ahamadnagar › शिर्डीच्या पवार मृत्यूची सीआयडी चौकशी करा

शिर्डीच्या पवार मृत्यूची सीआयडी चौकशी करा

Published On: Dec 13 2017 1:52AM | Last Updated: Dec 12 2017 10:57PM

बुकमार्क करा

नगर : प्रतिनिधी

वीस वर्षांपूर्वी झालेल्या याचिकाकर्तींच्या पतीच्या मृत्यूची चौकशी सीआयडीमार्फत करण्यात यावी तसेच तिला नुकसानभरपाईपोटी शासनाने  पाच लाख रुपये देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी.व्ही.नलावडे व न्या. ए.एम.ढवळे यांनी दिले.  तसेच प्रकरणातील संशयित व प्रतिवादी उत्तम शेळके हे प्रकरणात दोषी आढळल्यास त्यांच्याकडून नुकसानभरपाईची रक्कम वसूल करण्याची मुभा देण्यात आली. 

पतीच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी आणि नुकसानभरपाईपोटी तीन लाख रुपये मिळावेत अशी विनंती करणारी फौजदारी याचिका सीताबाई पवार यांनी दाखल केली होती. शिर्डी येथील उत्तम शेळके यांच्याकडे मयत प्रकाश पवार हा मजूर म्हणून काम करत होता. शेतातील पाईपलाईन फुटल्यावरुन त्यांनी प्रकाशला कामावरुन काढून टाकले. 15 ऑगस्ट 1996 रोजी मजुरीची थकीत रक्कम आणण्यासाठी उत्तम शेळके यांच्याकडे जात असल्याचे त्याने पत्नी सीताबाईला  सांगितले. मात्र दोन दिवस होऊनही पती न आल्याने तिने शिर्डी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तिला पतीच्या प्रेताचे फोटो व कपडेच दाखविले. तसेच प्रेताची ओळख न पटल्याचे कारण दाखवत नगर पालिकेकडे अंत्यसंस्कारासाठी पाठविल्याचे तिला सांगण्यात आले.

प्रकरणात संशय बळावल्याने तिने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडे घेतली.पण तिला दाद मिळाली नाही. यावर तिने 2001 मध्ये उच्च न्यायालय खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली. गृहमंत्रालयाचे सचिव, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक, शिर्डी पोलिस निरीक्षक, उपविभागीय अधिकारी आणि उत्तम शेळके यांना प्रतिवादी करण्यात आले. प्रतिवादी शेळके यांनी, प्रकाश  दारु पिऊन भेटायला आल्याचे आणि  वादानंतर पळून गेल्याचे म्हणणे मांडले. प्रकाश पवार याचा मृतदेह शेळके यांच्या विहिरीत आढळला. खून प्रकरणात संशयाला जागा असल्याची नोंद घेत खंडपीठाने  जिल्हा पोलीस उपअधीक्षकांना प्रकाश पवार यांच्या मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे व याचिकाकर्तीला पाच लाखांच्या नुकसानभरपाईचे आदेश दिले. याचिकाकर्तीच्या वतीने अ‍ॅड. बी. एस. कुदळे यांनी काम पाहिले.