होमपेज › Ahamadnagar › बेलपिंपळगावमधील दोन एकर उसाचा फड जळाला

बेलपिंपळगावमधील दोन एकर उसाचा फड जळाला

Published On: Dec 14 2017 1:43AM | Last Updated: Dec 14 2017 1:05AM

बुकमार्क करा

बेलपिंपळगाव : वार्ताहर

बेलपिंपळगाव येथील हरिहर बाबा मंदिर जवळील दोन एक उसाच्या फडाला शॉटसर्किटने आग लागून दोन शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. बेलपिंपळगाव येथे शकुंतला अशोक पुंड यांचा व अमोल पुंड यांचे उसाचे क्षेत्र आहे. दरम्यान, काल दुपारी 2 ते 2.30 वाजण्याच्या सुमारास अचानक उसाने पेट घेतला. यावेळी जवळील शेतात काम करीत असलेल्या महिलांनी आरडाओरडा केला. काही वेळेतच लगतच्या शेतकर्‍यांनी तिकडे धाव घेऊन आग विझवण्याचा आटोकाट  प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात आणणे अशक्य होते. यावेळी शेतकर्‍यांनी तात्काळ अशोक कारखाना व श्रीरामपूर नगरपालिका यांना फोन करून घटनेची माहिती दिली. या दोन्ही प्रशासकीय विभागाने तातडीने अग्निशामक गाडी घटनास्थळी रवाना केल्या. 

तोपर्यंत्त गावात या घटनेची माहिती वार्‍यागत पसरली होती. अनेक नागरिक मदतीला धावले. मात्र, आगीने रुद्रावतार घेतल्याने अग्नीशामक दल येऊपर्यंत पुंड यांचे मोठे नुकसान झाले.  पुंड यांच्या उसाला 5 ते 6 दिवसात तोडणी येणार होती. पण अचानक पेट घेतल्याने पुंड यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पुंड यांच्या शेतातून मेन लाईन गेली आहे, कुठे तरी शॉट सर्किट झाले व हे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यावेळी योगेश शिंदे, रंभाजी कांगुणे, सुनील शेरकर, गोकुळ पुंड, अमोल पुंड, उमेश शिंदे, येवले, सचिन जाधव, बाळासाहेब पटारे, किशोर बोखारे, रावसाहेब पुंड, आदी नागरिकांनी यावेळी मदतीला धाव घेतली. नागरिकांच्या प्रसंगावधानतेमुळे 5 एकर पैकी 3 एकर क्षेत्रावरील उसाचे पिक वाचवण्यात यश आले.