Thu, Jun 27, 2019 12:02होमपेज › Ahamadnagar › संगमनेरात गोमांस पकडले

संगमनेरात गोमांस पकडले

Published On: Dec 26 2017 1:31AM | Last Updated: Dec 26 2017 1:31AM

बुकमार्क करा

संगमनेर : प्रतिनिधी

शहर पोलिसांनी गेल्या दोन दिवसात केलेल्या कारवाईत दीड हजार किलो गोवंशाच्या मांसासह 20 हजार किंमतीचे चार जिवंत वासरांची मुक्तता केली आहे. याप्रकरणी दोन स्वतंत्र प्रकरणात तिघांवर गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली. स्थानिक असलेले दोन आरोपी मात्र पसार झाले आहे. या दोन्ही छाप्यात 1 लाख 50 हजार रूपयांचे गोमांस आढळले. तर दीड लाख रुपयांची क्‍वॉलिस गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 

शनिवारी सायंकाळी पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पंकज निकम व स्थानिक गुन्हे शाखे पोलिस हवालदार इस्माईल शेख, बाळासाहेब अहिरे, विजय पवार, गोरक्ष शेरकर, सागर धुमाळ, रमेश लबडे, सुनिल ढाकणे यांच्या पथकाने भारतनगरस्थित कुरेशीवाडा येथे छापा टाकला. यावेळी पोलिसांना कापलेल्या गोवंश जनावरांचे 800 किलो वजनाचे सुमारे 80 हजार रुपये किंमतीचे मांस आढळून आले. पोलिसांचा छापा पडण्यापूर्वी या वाड्यात कत्तल सुरु होती. मात्र पोलिस आल्याची  माहिती मिळताच आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. त्यामुळे चार जिवंत गोवंशाला जीवदान मिळाले. त्यांना जीवदया गोरक्षणात पाठविण्यात आले. याप्रकरणी पो.कॉ.बाळासाहेब अहिरे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी वसीम सलिम कुरेशी (रा.भारतनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेत रविवारी पोलिसांनी शहरालगतच्या मदिनानगर परिसरात छापा टाकत कत्तल केलेल्या गोवंश जनावरांचे मांस मुंबईकडे नेण्याच्या तयारीत असलेले क्वॉलिस वाहन (एम.एच.16 ई.3844) ताब्यात घेतले. या वाहनात पोलिसांना 70 हजार रुपयांचे 700 किलो गोवंशाचे मांस आढळून आले. या प्रकरणी पो.कॉ.विजय पवार यांच्या फिर्यादीवरुन आरोपी गुफाम असिफ शेख (रा.मदिनानगर) व मोबील अब्दुल शेख (रा.कुरेशीनगर, कुर्ला, मुंबई) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपी मोबील शेख याला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी मात्र पसार होण्यात यशस्वी ठरला.