Sat, Sep 22, 2018 20:49होमपेज › Ahamadnagar › वाळूतस्करांकडून मारहाण

वाळूतस्करांकडून मारहाण

Published On: Aug 26 2018 1:27AM | Last Updated: Aug 26 2018 1:10AMजामखेड : प्रतिनिधी

विंचरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करण्यास विरोध केल्याने एका शेतकर्‍यास वाळूतस्करांनी जबर मारहाण केली. याबाबत पोलिसांनी आठ जणांवर दरोडा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.24) रात्री साडेबारा वाजता घडली. 

आजिनाथ पांडुरंग लबडे (वय 34, रा. ओमासेवस्ती, पिंपरखेड, ता. जामखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांच्या घराजवळील विंचरणा नदीपात्रातून दिगंबर दौलत आढाव, भगवान पोपळे, बापू दत्तु आढाव (सर्व रा. फक्राबाद) वाळू उपसा करत होते. त्यावेळी त्यांच्याशी बाचाबाची झाली. त्या रागातून शुक्रवारी रात्री 12.30 सुमारास या तिघांसह वाळू भरणार्‍या अनोळखी पाच मजुरांनी आपल्याला घरात घुसून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. 

तसेच घरातील सामानाची उचकापाचक करून एक तोळ्याचे गंठण, अर्धा तोळ्याची कर्णफुले, अर्धा तोळ्याचा सोन्याचा बदाम, असे दोन तोळे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाले. मारहाणीत लबडे यांच्या मांडीवर व हातावर चाकूने वार करून त्यांना जबर जखमी केले. या प्रकरणी जामखेड पोलिसांनी दरोड्याचा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नामदेव सहारे, पो. ना. दिनानाथ पातकळ, पो. कॉ. गहिनीनाथ यादव करीत आहेत.