होमपेज › Ahamadnagar › लालमातीचा शिलेदार गेला काळाच्या पडद्याआड 

लालमातीचा शिलेदार गेला काळाच्या पडद्याआड 

Published On: Jan 22 2018 1:26AM | Last Updated: Jan 21 2018 10:42PMकर्जतः गणेश जेवरे 

कर्जत तालुक्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्रीडा अशा सर्वच विभागामध्ये गेली 86 वर्षे ज्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली असे एक वादळ निसर्गाच्या कुशीमध्ये शांत झाले ते कायमचे!
तालुक्याचे सुपूत्र, मुत्सुदी राजकारणी बापूसाहेब देशमुख यांचे  निधन झाले.  बापूसाहेब अनेकांना आधार देणारा वटवृक्ष होता. या वटवृक्षाच्या सावलीमध्ये अनेकांच्या जीवनातील उन्हाळ्याच्या चटके बसण्यापासून सरंक्षण झाले आहे. काही माणसे राजकारणात इतके हरवून जातात की त्यांची खास वैशिष्ट्ये झाकोळून जातात. मूळ चेहराच हरवून जातो. मात्र, बापूसाहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे मोकळ्या मनाचा आणि तितकाच दिलदार नेता.

कर्तृत्वाचा आलेख काढतानाही त्यांनी माणूसपण त्यांनी कधीच ढळू दिले नाही. त्यांची निरीक्षण क्षमता अफाट होती. नजरेतूनच सर्व काही समजून यायचे. वागण्यात आणि बोलण्यात सुसंस्कृतपणा होता. कधीच कोणाला अपशब्द वापरले नाही. ते पहिलवान होते. पहाडासारखे मात्र मनाने मेणाहून मऊ. एखाद्याच्या डोळ्यात अश्रू दिसले तर बापूसाहेबांच्या डोळ्यात अश्रू उभे रहात. जगदंबा कारखाना उभारल्यावर अनेकांच्या चुली पेटल्या. बापूसाहेबांमुळे तालुक्यात सहकार भरभराटीस आला. त्यांचा दबदबा जिल्ह्यात होता. दिवंगत नेते विलासराव देशमुखांशी त्यांचे नाते होते. राजकारणाबाबत विलासराव बापूसाहेबांशी चर्चा करीत.

बापूसाहेबांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब विखे पाटील, मारूतराव घुले पाटील, शंकरराव कोल्हे यांच्यासोबत काम केले. आता विक्रम आणि राजेंद्र व इतर नातू देखील बापूसाहेबांचा राजकारणाचा वारसा चालवित आहेत. विकासाचा पाया बापूसाहेबांनी रचला. लालमातीचा शिलेदार अशी त्यांची ओळख होती. त्यांनी पहिलवानकी केली मात्र ती जनतेसाठी. जनतेच्या रक्षणासाठी. राजकारण देखील त्यांनी अस्सल खिलाडूवृत्तीने केले. असा नेता आपल्यातून कायमचा गेला आहे. आठवणी मात्र कायमच्या राहिल्या आहेत.