Tue, Jul 23, 2019 16:57होमपेज › Ahamadnagar › बँकांनी शेतकर्‍यांना तात्काळ कर्ज द्यावे

बँकांनी शेतकर्‍यांना तात्काळ कर्ज द्यावे

Published On: Jul 29 2018 1:20AM | Last Updated: Jul 28 2018 11:53PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकर्‍यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक कर्जासाठी अडवणूक करून त्यांना कर्जासाठी चकरा मारायला लावू नये, असे आवाहन आ. भाऊसाहेब कांबळे यांनी केले.

बँक ऑफ महाराष्ट्र दशमेशनगर शाखेच्यावतीने डावखर लॉन्स येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भैरवनाथनगरचे सरपंच भारत तुपे, नगरसेवक संतोष कांबळे, सहा. गटविकास अधिकारी काळोखे, वडाळा महादेवचे उपसरपंच सुनिल कुदळे, बँक शाखाधिकारी शरद कळमकर, शैलेश पाटील, रंगनाथ आदमाने, प्रल्हाद अमोलिक, भारत तुपे, अविनाश अमोलिक, नानासाहेब तुपे, अमोल लबडे, शिवाजी सोनवणे आदींसह बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

आ. कांबळे म्हणाले, शेतकर्‍यांना दिलेल्या कर्जाची परतफेड शेतकर्‍याच्या मालाला मिळणार्‍या भावावर अवलंबून असल्याने अनेकदा कर्ज वेळेवर फेडले जात नाही. महाराष्ट्र बँकेचे काम चांगले असून मुख्य प्रबंधक शरद कळमकर हे शेतकर्‍यांना सुविधा देण्याबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी याचा फायदा घेऊन घेतलेले कर्ज फेडण्याबाबत व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा. अवास्तव कर्ज न घेता आपली बँकेत पत कायम राहिल याकडे लक्ष द्यावे.

प्रास्ताविकात बँक अधिकारी शैलेश पाटील यांनी बँकेच्या सध्याच्या धोरणाबाबत सविस्तर माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी बँकेच्या माध्यमातून कृषी कर्जाविषयी माहिती करुन घ्यावी, असे आवाहन करुन अध्यक्षीय निवडीची सूचना मांडली. या सूचनेला सूर्यकांत डावखर यांनी अनुमोदन दिले. बँकेचे मुख्य प्रबंधक शरद कळमकर यांनी पीक कर्जाबाबत माहिती देताना बँकेकडून घेतलेले कर्ज वेळेत फेडल्यानंतर आपली पत तयार होते व कुणाचीही अडवणूक होत नाही असे सांगून शैक्षणिक कर्ज, गृह कर्ज याबाबत माहिती दिली. 

नगरसेवक संतोष कांबळे यांनी वर्ग 2 च्या जमिनधारकांना कर्ज प्रकरणासाठी अडचणी येत असल्याने बँकेने याकडे लक्ष द्यावे, असे सांगितले. भारत तुपे यांनी बँकेच्या व्यवहारासाठी आयएफसी कोड महत्वाचा असून बँकेने शेतकर्‍यांसाठी एक खिडकी योजना सुरु करुन एक दिवस शेतकर्‍यांसाठी ठेवावा, अशी सूचना केली. यावेळी सुनिल कुदळे, संजय करडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.