Wed, Apr 24, 2019 01:31होमपेज › Ahamadnagar › बँक संचालक शेतकर्‍याची आत्महत्या

बँक संचालक शेतकर्‍याची आत्महत्या

Published On: Apr 23 2018 1:13AM | Last Updated: Apr 23 2018 12:57AMजंक्शन : वार्ताहर 

जलसंपदा विभागाकडून शेतीसाठी वेळेवर पाणी मिळत नसल्याने इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान संचालक व शेतकरी वसंत सोपाना पवार (48, रा. बेलवाडी) यांनी  विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी पवार यांनी दोन चिठ्या लिहून ठेवल्या असून आत्महत्येस जबाबदार असणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. यामध्ये जलसंपदाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

वालचंदनगर पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत पवार यांचे लासुर्णेमध्ये हार्डवेअर व रासायनिक खतांचे दुकान आहे. लासुर्णे व बेलवाडी परिसरामध्ये त्यांची शेती आहे. शनिवारी (दि.21) लासुर्णे येथील दुकान बंद केल्यानंतर ते घरी गेलेच नव्हते. घरातील लोकांनी रात्रभर शोध घेतला, मात्र त्यांचा शोध लागला नव्हता.  रविवारी (दि.22) सकाळी त्यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या जामदारवस्ती जवळील विहिरीमध्ये पाण्यावरती तरंगत असल्याचा आढळून आला. 

वालचंदनगर पोलिसांनी तातडीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये दोन चिठ्या आढळल्या आहेत. यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे पिके जळाल्याने  आर्थिक अडचणीमध्ये वाढ झाल्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे, असे नमूद केले आहे.

पवारांनी पाण्यासाठी केले होते आंदोलन

जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे निरा डाव्या कालव्यातून उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळण्यास विलंब होत असल्यामुळे वसंत पवार व परिसरातील शेतकर्‍यांनी 13 एप्रिल रोजी लासुर्णेजवळील चिखलीफाटा येथे 42 व 43 क्रमांकाच्या वितरिकेस पाणी सोडण्यासाठी  रास्ता रोको आंदोलन केले होते. जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांनी 42 व 43 क्रमांकाच्या वितरिकेस 17 व 19 एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले होते.परंतु अद्याप या दोन्हीही वितरिकेस पाणी सोडण्यात आले नाही.यामुळे या परिसरातील सात हजार एकरातील पिके जळून जाऊ लागली आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहायक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक फौजदार शिवाजी होले, महेंद्र फणसे करीत आहेत.

हर्षवर्धन पाटील यांनी न्याय मिळवून द्यावा

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. हेमंतराव नरुटे, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, दुधगंगाचे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, मार्केट कमिटीचे माजी संचालक अनिल पवार, माजी उपसरपंच प्रकाश चव्हाण यांनी शेतीसाठी पाणी प्रश्‍नावरून सरकारच्या विरोधात आवाज उठवून कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची प्रयत्न करावा, असे वसंत पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे.

जलसंपदाचा शेतकर्‍यांचा असह्य त्रास

कालव्याला पाणी सोडण्यासाठी, त्यानंतर पोटचार्‍यांतून पाणी मिळण्यासाठी शेतकर्‍यांकडून ‘झिजिया’ करासारखी वसुली जलसंपदातील अधिकारी आणि कर्मचारी विशेषत: पाटकरी गेल्या कित्येक वर्षांपासून वसूल करत आहेत. हे उघड सत्य आहे. या प्रकाराकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष झाले आहे. सध्या शेतमालाचे पडलेले भाव, त्यातून आलेला कर्जबाजारीपणा आणि जलसंपदाची ‘झिजिया’ वसुली यामुळे शेतकरी अतिशय त्रासलेला आहे. त्यातूनच ही घटना घडली आहे. अर्बन बँकेच्या संचालक पदासारख्या मोठ्या ठिकाणी कार्यरत असणारे, शेतीबरोबरच व्यापार उद्योग उभारणारे वसंतराव पवार यांच्यासारखे विचारी व्यक्तिमत्त्व थेट आत्महत्येचा विचार अंमलात आणते, यावरूनच शेतकरी किती त्रस्त झाला आहे आणि त्याला जलसंपदाच्या कर्मचारी, अधिकार्‍यांचा किती असह्य त्रास होत आहे, हेच दिसून येते.