Fri, Jul 19, 2019 01:39होमपेज › Ahamadnagar › ..तर आरोपींच्या संपत्तीवर टाच!

..तर आरोपींच्या संपत्तीवर टाच!

Published On: May 09 2018 1:52AM | Last Updated: May 09 2018 12:00AMनगर : प्रतिनिधी

केडगाव दुहेरी हत्याकांडातील फरार असलेल्या भानुदास कोतकरसह 21 आरोपींविरुद्ध पोलिसांच्या अहवालावरून न्यायालयाने स्टँडिंग वॉरंट जारी केले आहे. वॉरंटनुसार ते पोलिसांत हजर झाले नाही, तर त्यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची कार्यवाही केली जाण्याची शक्यता आहे. 

शिवसैनिक संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या खुनाच्या गुन्ह्यात आतापर्यंत आ. संग्राम जगताप, नगरसेवक विशाल कोतकर, संदीप गुंजाळसह 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने फरार असलेल्या भानुदास कोतकर, औदुंबर कोतकर, अशोक कराळे, नवनाथ कराळे, मोहसीन सलीम शेख, विजय एकनाथ कराळे, रमेश तात्याभाऊ कोतकर, शरद रामचंद्र जाधव, दादा बन्शी येणारे, विनोद शिवाजी लगड, मनोज भाऊ कराळे, मयुर शाम राऊत, शरद वामन लगड, स्वप्निल पोपट पवार, संकेत शरद लगड, बाबासाहेब बापू कोतकर, राजू देवराम गांगड, अप्पासाहेब नामदेव दिघे, बाबुराव रामभाऊ कराळे, ज्ञानेश्‍वर यादव कोतकर (सर्व रा. केडगाव), वैभव धोंडिराम वाघ (रा. नालेगाव) अशा 21 जणांविरुद्ध स्टँडिंग वॉरंट (पोलिसांत हजर राहणे) जारी करण्याबाबतचा अहवाल तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी न्यायालयात सादर केला होता. त्यावरून न्यायालयाने संबंधितांविरुद्ध स्टँडिंग वॉरंट जारी केले आहे.

जारी केलेल्या वॉरंटची बजावणी करण्याबाबत आरोपींचा विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) शोध सुरू आहे. परंतु, अजून कोणीही हजर झालेले नाही. ते हजर झाले नाही, तर पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. त्यानुसार आरोपींना फरार घोषित करून त्यांच्या मालमत्तेवर टाच आणण्याची कार्यवाही करण्याबाबतची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

आ. कर्डिले, आ. जगताप यांचे नाव वगळले

पोलिसांच्या अहवालानुसार जारी केलेल्या स्टँडिंग वॉरंटमध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटक न केलेल्या भाजपाचे आ. शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादीचे आ. अरुण जगताप यांचे नाव वगळण्यात आलेले आहे. आ. कर्डिले हे पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात पोलिसांत स्वतःहून हजर झाले होते. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्यासह आ. अरुण जगताप यांच्याविरोधात खुनाच्या कटातील (भादंवि 120-ब) सहभागाबाबत अद्याप पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे स्टँडिंग वॉरंटमधून त्यांची नावे वगळण्यात आलेली आहेत. कटातील सहभागाचे पुरावे मिळाले तरच अटकेची कार्यवाही होईल, असे सूत्रांकडून समजले.