होमपेज › Ahamadnagar › आ. बाळासाहेब थोरातांची राष्ट्रीय समितीवर निवड

आ. बाळासाहेब थोरातांची राष्ट्रीय समितीवर निवड

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 19 2018 12:15AMसंगमनेर : प्रतिनिधी

महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीवर कायमस्वरुपी निमंत्रीत सदस्य म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे जनरल सेक्रटरी अशोक गेहलोत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. 

देशात आगामी विविध राज्यांच्या विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका, तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल केले आहेत. यात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या कार्यकारी समितीवर नगर जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आ. बाळासाहेब थोरात यांची निवड केली आहे. या समितीत माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, माजी केंद्रीय मंत्री पी. चिंदम्बरम, ज्योतीराजदित्य शिंदे, तारीक अहमद, राजीव सातव यांसह 11 जणांचा समावेश आहे. 

सहकारातील दीपस्तंभ स्वातंत्र सैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा वारसा लाभलेले आ.  थोरात यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. गोरगरीब व  सर्व सामान्य नागरिक, कार्यकर्ते, युवक यांच्याबरोबर थेट संबंध आणि राज्याच्या विविध विभागांतील प्रश्‍नांचा अभ्यास यामुळे त्यांचे नेतृत्त्व लोकप्रिय ठरले आहेत. राज्यमंत्री मंडळात कृषी, शालेय शिक्षण, पाटबंधारे, खार जमीन, जलसंधारण, रोहियो, राजशिष्टाचार व महसूल या विभागांमधून उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे.

यामुळे उभ्या महाराष्ट्रात त्यांचा आदर केला जातो. स्वच्छ व कार्यक्षम प्रतिमा असलेल्या आ.  थोरात यांच्यावर मागील निवडणुकांमध्ये पक्षाने प्रचाराची मोठी जबाबदारी दिली होती. ती यशस्वीपणे पार पाडताना आ. थोरात यांनी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळवून दिले. पक्षाध्यक्ष खा. राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान  डॉ. मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्व राष्ट्रीय नेत्यांचा आ. थोरात यांचेवर मोठा विश्‍वास आहे. त्यामुळेच त्यांची राष्ट्रीय कार्यकारणीत ही निवड करण्यात आली. या निवडीने संगमनेरच्या नेतृत्त्वाचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला आहे. आ. थोरात यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरील निवडीचे वृत्त समजताच संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.