Sun, May 26, 2019 20:51होमपेज › Ahamadnagar › सरकारचा एलआयसीवर डोळा : बाळासाहेब थोरात

सरकारचा एलआयसीवर डोळा : बाळासाहेब थोरात

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 10:41PMसंगमनेर : प्रतिनिधी

नोटाबंदी असो की जीएसटी देशातल्या सामान्य माणसांच्या घामाच्या पैशांशी क्रूर खेळी करायची एक विकृत सवय भाजपा सरकारला लागली आहे. निवडणुका तोंडावर आल्या की वेगळेच काहीतरी करायचे, ही या सरकारची खेळीच असते. जनतेने पिढ्यानपिढ्या  विश्‍वासाने एलआयसीमध्ये गुंतवलेल्या पैशावर आता हे सरकार डाका घालायला निघाल्याची टीका माजी कृषिमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी  केली.

आ. थोरात म्हणाले की, सन 2013 सुधारित नियमांनुसार आयुर्विमा महामंडळाला कुठेही 15 टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक करता येत नाही. मागच्या शुक्रवारी ईडीने स्वत:चाच नियम मोडून या सरकारी प्रस्तावाला मान्यता दिली. मोदी सरकारचा प्रस्ताव नाकारण्याची आजकाल कुणाची हिंमत नसते. 

आयुर्विमा महामंडळाकडे रग्गड पैसा आहे. (दर वर्षी दोन लाख कोटी रुपये त्यांच्याकडे लोकांनी भरलेल्या प्रिमीयमपोटी जमा होत असतात) त्यामुळे ही गुंतवणूक नगण्य आहे, असा प्रचार सध्या सरकार करत आहेत. अर्थात त्यांच्या मते हा आचरटपणा आयुर्विमा महामंडळाला पार बुडीत नेऊ शकतो. एखादी विमा कंपनी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे कि नाही, ते तिच्याकडील असलेल्या संपत्तीवरून ठरत नाही. आपल्या ग्राहकांना ती जे देणं लागते त्याप्रमाणात ती संपत्ती आहे का ? यावर ते ठरत असल्याचे त्यांनी  सांगितले. 

आयडीबीआय बँकेला वाचविण्यासाठी मोदी सरकारचा हा आटापिटा चाललाय. ती बँक एक तळ नसलेलों विवर आहे. गेल्या वर्षी तिची थकित कर्ज 44 हजार  कोटी रुपये होती. ती यंदा 55 हजार कोटी रुपयांवर गेली आहेत. गतवर्षी 3200 कोटी रुपये तोटा झाला होता. तो आता 5663 कोटी रुपये झाला आहे. तिच्या पुनर्जिवनाची जबाबदारी स्वत: घेण्याएवजी सरकार हे लोढणं तुमच्या आमच्या गळ्यात बांधत आहे. आयुर्विमा महामंडळाला त्यामुळे बँकिंग क्षेत्रात उतरण्याची संधी मिळेल. आय.डी.बी. आयच्या शाखेच देशभर जाळे आहे. त्याचा वापर करता येईल, असा हास्यास्पद प्रचार सरकारतर्फे चालू असल्याचे त्यांनी सांगितले. 

सरकारकडे आर्थिक साक्षरता हवी, जी माजी पंतप्रधान व अर्थात डॉ.मनमोहनसिंह यांच्याकडे विपुल प्रमाणात होती, असे सांगून हे सरकार विम्याचा खिमा करायला निघाल्याीच टीकाही आ. थोरात यांनी केली.