Tue, Apr 23, 2019 09:49होमपेज › Ahamadnagar › बजाज फायनान्सच्या ग्राहकांची फसवणूक

बजाज फायनान्सच्या ग्राहकांची फसवणूक

Published On: May 22 2018 1:23AM | Last Updated: May 22 2018 1:23AMनगर : प्रतिनिधी

बजाज फायनान्सचे लोन घेतलेल्या ग्राहकांना ‘ओटीपी’ मागून लुटणारी तिघांची टोळी सायबर पोलिसांनी जेरबंद केली असून, त्यांच्याकडून 25 गुन्हे उघडकीस आले आहेत. या टोळीकडे देशभरातील कामगार, कंपन्यांसह अमेरिका, इंग्लडमधील नागरिकांचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेलचा डेटा आढळून आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. नगरच्या सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पवार यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ही कारवाई केली. 

अटक केलेल्यांमध्ये प्रशांत श्रीकृष्ण गारमोडे (28, रा. सी 1, पिंटू कॉलनी, सैलानी स्टॉप, जेल रोड, नाशिक), मुहम्मद इजाज मुहम्मद इक्बाल (33, रा. बारी कॉलनी, रोशन गेट, औरंगाबाद), नरेंद्र नानुराम दायमा (33, रा.फ्लॅट नंबर 1-701, प्रिन्स प्लाझा, भाईंदर, ठाणे) यांचा समावेश आहे. ही टोळी सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांनी नगरमधील 7 व इतर असे मिळून एकूण 25 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यातील गारमोडे याच्याकडे बजाज फायनान्सचा मुंबई, धुळे, नगर, पुणे, नागपूर, अमरावती, अकोला जिल्ह्यांतील डेटा मिळाला आहे. तर दायमा याच्याकडे देशभरातील कामगार, कंपन्या, ऑनलाईन विक्रेते, अमेरिका व इंग्लड येथील कोट्यवधी ग्राहकांचा डेटाबेस मिळाला आहे. त्यांच्याकडून 1 लॅपटॉप, 19 मोबाईल हॅण्डसेट, 12 सिमकार्ड, 2 मेमरी कार्ड, 3 डेबीट कार्ड, असा 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शहराजवळील नागापूर येथील पितळे कॉलनीतील संतोष काकडे यांना 19 फेब्रुवारी रोजी एक फोन आला होता. बजाज फायनान्समधून बोलतोय, असे सांगितले. ‘जुने लोन खाते बंद करण्यासाठी ओटीपी येईल, तो पाठवा’, अशी बतावणी करून काकडे यांच्या लोन खात्यावरून 16 हजार 900 रुपयांची फ्लिपकार्डमार्फत खरेदी करून फसवणूक केली. संतोष बाबुराव गडाख (रा. पारेगाव बुद्रूक, ता. संगमनेर) यांनाही बजाज फिनसर्व्ह कंपनीतून बोलत असल्याचे सांगून ओटीपी मागून जुन्या लोन खात्यावरून 52 हजार 700 रुपयांची फ्लिपकार्डमार्फत खरेदी करून फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, अंबादास भुसारी, उपनिरीक्षक किर्ती पाटील, प्रतिक कोळी, कर्मचारी सलीम पठाण, वसंत वाव्हळ, राहुल गुंडू, अरुण सांगळे, प्रशांत राठोड आदींच्या पथकाने गुन्ह्याचा तपास करून सुरुवातीला प्रशांत गारमोडे यास नवी मुंबई येथून अटक केली. त्यानंतर मुहम्मद इजाज याला औरंगाबाद व नरेंद्र दायमा याला भाईंदर येथून अटक केली. गारमोडे याने दायमा याच्याकडून बजाज फिनसर्वचा डेटा विकत घेतला होता. गारमोडे हा पूर्वी बजाज फायनान्समध्ये काम करीत असल्याने, त्याने बजाज फायनान्सचा डेटा मिळविला होता. मुहम्मद इजाज याच्या पत्त्यावर ऑनलाईन खरेदी केलेला माल मागविला जात होता. तो माल विकून दोघे पैसे वाटून घेत होते. 

दायमा याच्या लॅपटॉपमध्ये कोट्यवधी नागरिकांचा डेटा सापडला आहे. या टोळीकडून नगर, पुणे, धुळे, नाशिक, अमरावती, मुंबई, नवी मुंबई येथील 25 गुन्ह्यांची उकल झाली आहे. राज्याबाहेरीलही काही नागरिकांची फसवणूक झाली आहे. दायमा याच्याकडे परदेशातील डेटा सापल्याने अमेरिका व इंग्लड येथील कोणाची फसवणूक केली आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे, असे शर्मा यांनी सांगितले.

संगणक अभियंता झाला सायबर गुन्हेगार!

गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रशांत गारमोडे याने संगणकशास्त्रात अभियांत्रिकीची पदविका घेतलेली आहे. त्यानंतर त्याने बजाज फायनान्स येथे दोन वर्षे नोकरीही केली. त्या कंपनीचे कामकाज कसे चालते, याचा अभ्यास करून त्याने बजाज फायनान्सच्याच ग्राहकांना लुटण्याचा धंदा सुरू केल्याचे पोलिस चौकशीतून पुढे आले आहे.