Tue, Nov 13, 2018 10:20होमपेज › Ahamadnagar › शिवसैनिकांना जामीन

शिवसैनिकांना जामीन

Published On: May 12 2018 1:23AM | Last Updated: May 11 2018 11:52PMनगर : प्रतिनिधी

केडगाव दगडफेक प्रकरणात अटक केलेल्या 16 शिवसैनिकांना काल (दि. 11) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एस. पाटील यांच्या न्यायालयाने प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. जामीन झालेल्यांपैकी 7 जणांनी सायंकाळी उशिरा जातमुचलक्याची कायदेशीर पूर्तता केली. त्यांची आज (दि. 12) सकाळी सुटका होईल. उर्वरीत 9 जणांच्या जातमुचलक्याची प्रक्रिया रखडल्याने त्यांचा कारागृहातील मुक्काम दोन दिवसांनी वाढला आहे.

केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांवर दगडफेक, धक्काबुक्की करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी 9 जण पोलिसांना शरण आले होते. तसेच 7 जणांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या 16 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनाविल्यानंतर आरोपींच्यावतीने न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर शुक्रवारी (दि. 11) सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या वैयक्तीक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. 

आरोपींना सायंकाळी जामीन मंजूर झाल्यानंतर नगरसेवक सचिन जाधव, योगिराज गाडे, माजी नगरसेवक अशोक दहिफळे, रावजी नांगरे, अमोल येवले, विठ्ठल सातपुते, राजेंद्र पठारे यांनी तातडीने जातमुचलक्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे 7 जणांची शनिवारी सकाळी कारागृहातून सुटका होईल. उर्वरीत 9 जणांची जातमुचलक्याची कायदेशीर पूर्तता पूर्ण होऊ शकली नाही. सलग दोन दिवस सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका होईल. जामिनाची प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने 9 शिवसैनिकांचा कारागृहातील मुक्काम दोन दिवसांची वाढला आहे.