Sat, Jul 20, 2019 09:11होमपेज › Ahamadnagar › पाच दारूची दुकाने हाच त्यांचा विकास : पाचपुते

पाच दारूची दुकाने हाच त्यांचा विकास : पाचपुते

Published On: Sep 10 2018 1:15AM | Last Updated: Sep 10 2018 1:15AMकाष्टी : वार्ताहर 

मी उत्पादनशुल्क मंत्री असताना देखील एकही दारूचे दुकान घेतले नाही. पण आपल्या लोकप्रतिनिधींनी आमदार होताच, कुकडी कारखान्याचा काटा मारून सर्वसामान्य शेतकर्‍यांचे संसार उद्ध्वस्त केले आणि  देशी-विदेशी दारूची पाच दुकाने विकत घेतली. हाच तर त्यांचा विकास आहे, असे प्रतिपादन माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी केले. 
श्रीगोंदा तालुक्यात माजीमंत्री पाचपुते यांचा 64 वा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस अध्यक्षस्थानी होते.

पाचपुते म्हणाले की, मोठा अपघात झाला पण खरचटले सुद्धा नाही. एवढ्या अडचणी आल्या. पण न खचता न डगमता मी उभा आहे, तो कार्यकर्त्यांच्या उर्जेवरच. माझ्या अडचणीत कोणी कोणी भर घातली ते सगळ्यांना ज्ञात आहे. मी कोणाचे काय वाईट केले? मंत्री नसतानाच्या कार्यकाळातील चौकशी कशी झाली, केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न कसा झाला? तरीही संघर्षातून समृद्धीकडे तालुक्याची वाटचाल करीत आहे. विकास कामांबाबत कधीही घरी बसलो नाही. मंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो. मांडेल तो प्रश्‍न त्यांनी मार्गी लावला. 25 वर्षांचा हिशोब विचारणार्‍यांनी चार वर्षांत काय दिवे लावले? समोरासमोर या आणि चर्चा करा.  सन 2014 च्या विधानसभेला पैसा जिंकला अन् काम हारले. पण काम सदैव हरत नाही. सन 2019 च्या विधानसभेला जनतेच्या आशीर्वादाने विरोधकांना चितपट करणार आहे.

सदाशिव पाचपुते म्हणाले की, तालुक्यातील लोकप्रतिनिधी फसवेगिरी करीत आहेत. बबनराव पाचपुतेंच्या कामांची कॉपी करण्याचा एकमेव धंदा सुरू आहे. नगरपालिका निवडणूक शांत डोके ठेवून लढवावी लागणार आहे. श्रीगोंद्यात कोट्यवधींचा निधी आला. त्यावर कोणी चर्चा करत नाही. 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष लगड, नगराध्यक्ष मनोहर पोटे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक यांची भाषणे झाली. व्यासपीठावर प्रतिभा पाचपुते, माजी सभापती पुरुषोत्तम लगड, लक्ष्मण नलगे  रमेश गिरमकर, अ‍ॅड. जे. डी. अनभुले, उपसभापती अ‍ॅड. वैभव पाचपुते, सुनिल दरेकर, सरपंच सुलोचना वाघ, उत्तम मोरे, प्रताप देशमुख, पोपट माने, गणपत परकाळे,  बापूसाहेब गोरे, नानासाहेब कोथिंबीरे, जयश्री कोंथंबीरे डॉ. स्मिता तरटे  सतीश मखरे, संतोष खेतमाळीस आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.