Tue, Jul 23, 2019 17:40होमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : बीएलओंच्या दप्तराची होणार तपासणी; दोषींवर होणार कारवाई

अहमदनगर : बीएलओंच्या दप्तराची होणार तपासणी; दोषींवर होणार कारवाई

Published On: Jul 23 2018 11:27AM | Last Updated: Jul 23 2018 11:27AMनगर : प्रतिनिधी

अहमदनगर जिल्ह्यातील कामचुकार मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या मतदार याद्या तयार करणे व निवडणूक विषयक कामाचा जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी आणि उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर हे मंगळवारपासून स्वतः आढावा घेणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील दिनांक १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या तयार करणे आणि निवडणूक विषयक कामात टाळाटाळ आणि हलगर्जीपणा झाल्याचे समोर आले होते. असे करणाऱ्या सर्व १४ तालुक्यातील कामचुकार  बीएलओंनी आज पर्यंत मतदार यादी व निवडणूक विषयक केलेल्या कामाची जिल्हाधिकारी  संबंधित बीएलओंना जिल्हाधिकारी कार्यालयात समक्ष बोलावून कामाची तपासणी करुन आढावा घेणार आहेत.

जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या समोर नेमक्या कोणत्या कामचुकार बीएलओ यांना बोलवायचे याची तालुकानिहाय यादी अंतिम करण्यात येत आहे. संबंधित बीएलओंना अचानक एक दिवस अगोदर कळविण्यात येईल त्यानंतर त्यांच्या कामची तपासणी करण्यात येणार आहे.

कामचुकारपणा केल्याचे अढळल्यास दोषींवर लोक प्रतिनिधी अधिनियम १९५० चे कलम ३२ नुसार तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. या मध्ये कामचुकार बीएलओ यांना दोन वर्षे, सश्रम कारावास आणि दंड अशा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. तसेच वरिल तुरुंगवास व दंड या शिक्षेशिवाय शासकीय नोकरी मध्ये असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विरूध्द निलंबन व सेवेतुन बडतर्फ करणे, अशीही शिक्षा होऊ शकते.