होमपेज › Ahamadnagar › हल्लाबोल आंदोलन ही ‘त्यांची’ अनास्था

हल्लाबोल आंदोलन ही ‘त्यांची’ अनास्था

Published On: Dec 13 2017 1:52AM | Last Updated: Dec 12 2017 11:26PM

बुकमार्क करा

शिर्डी : प्रतिनिधी

राज्यातील जनतेच्या विविध प्रश्‍नांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हल्लाबोल आंदोलन होत आहे. ही त्यांची राजकीय विवशता असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे. शिर्डी येथे साई दर्शनासाठी आले असता पत्रकारांशी  ते बोलत होते. याप्रसंगी आ. शिवाजीराव कर्डिले, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौरे, माजी विश्‍वस्त सचिन तांबे, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, दिलीप संकलेचा, गजानन शेर्वेकर, रवींद्र गोंदकर, किरण बोराडे आदी उपस्थित होते.

प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले, राज्य सरकारने 34 हजार 200 कोटींची कर्जमाफी केली असून, त्याचा जवळपास 90 हजार शेतकर्‍यांना फायदा होणार आहे. शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यासही सुरुवात झाली आहे. परंतु, काँगे्रस-राष्ट्रवादी हल्लाबोलद्वारे जनतेचे लक्ष विचलित करीत आहे. ही त्यांची राजकीय विवशता आहे. राज्य सरकार त्यांच्याकडे कोणतेही लक्ष न देता शेतकर्‍यांकडे लक्ष देत आहे.

गुजरातच्या निवडणुकीबाबत  ते म्हणाले, निवडणूक अंदाज काही येऊ द्या. मी गुजरातमध्ये जावून वास्तविकता पाहिली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतही असाच अनुभव होता. मात्र, तिथेही आम्ही बाजी मारली होती. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपाच्या पहिल्यापेक्षा अधिक 150 जागा निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याबाबत ते म्हणाले,  या सोहळ्यासाठीही आम्ही निधी देणार आहोत. यासाठी त्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविणे गरजेचे आहे. येत्या 20 तारखेला नागपूरमध्ये जाणार असून, तेथे मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.