Mon, Apr 22, 2019 15:39होमपेज › Ahamadnagar › उपमहापौर निवडणुकीत भाजपाची माघार!

उपमहापौर निवडणुकीत भाजपाची माघार!

Published On: Mar 02 2018 1:20AM | Last Updated: Mar 02 2018 12:34AMनगर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत श्रीपाद छिंदमने केलेल्या आक्षेपार्ह वक्‍तव्यामुळे बॅकफूटवर गेलेल्या भाजपाने प्रायश्‍चित्त म्हणून उपमहापौर पदावर पाणी सोडत निवडणुकीतून सपशेल माघार घेतली आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने नगरसेवक अनिल बोरुडे यांना उमेदवारी देत अर्ज दाखल केला आहे. सत्तेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही शिवसेनेशी फारकत घेत वीणा बोज्जा यांना रिंगणात उतरवले आहे. तर विरोधी पक्ष नेत्यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटातील राष्ट्रवादीचे समद खान व मुदस्सर शेख यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही रिंगणात उडी घेत विपुल शेटीया व आरिफ शेख यांचे अर्ज दाखल केले आहेत. त्यातच शिवसेनेतील नाराज दीपाली बारस्कर यांनीही अर्ज दाखल केल्यामुळे काल (दि.1) अखेरच्या दिवशी 7 इच्छुकांचे 10 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उपमहापौर निवडणुकीसाठी 5 मार्च रोजी होणार्‍या विशेष सभेत माघारीची मुदत दिली जाणार आहे. मात्र, सद्यस्थितीत ‘नको-नकोसे’ झालेल्या उपमहापौर पदासाठी अनपेक्षितपणे चुरस निर्माण झाली आहे.

शिवसेनेत बंडाळी

युतीच्या जागावाटपात उपमहापौर पद भाजपाला देण्यात आले आहे. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून भाजपात उपमहापौर निवडणूक न लढविण्याबाबत हालचाली सुरु होत्या. त्यातच बुधवारी (दि.28) शिवसेनेचे नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी उमेदवारी अर्ज घेतला होता. अर्ज दाखल करण्यासाठी काल (दि.1) अंतिम मुदत असल्याने बुधवारी सायंकाळी शिवालयात शिवसेनेची बैठक पार पडली. उपमहापौर पदाची जागा भाजपाची असल्याने अभय आगरकर गटाकडून दत्तात्रय कावरे, बाबासाहेब वाकळे, उषा नलवडे यांच्यापैकी जो उमेदवार दिला जाईल, त्यांच्या सोबत शिवसेना राहील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मात्र, काल उपमहापौर निवडणुकीबाबत भाजपाची बैठक पार पडली.

यात भाजप निवडणूक लढविणार नसल्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर शिवसेनेने निवडणूक लढविण्याबाबत तात्काळ बैठक घेतली. डॉ. बोरुडे, दिपाली बारस्कर यांची नावे चर्चेत होती. महिला बालकल्याणच्या सभापती सारिका भुतकर यांनीही उपमहापौर पदासाठी इच्छा व्यक्‍त केल्याचे सांगण्यात आले. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी सर्वांशी चर्चा केली. मात्र, निवडणूक अटी-तटीची झाल्यास सक्षम उमेदवार म्हणून अखेर अनिल बोरुडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयानंतर नाराज झालेल्या डॉ. बोरुडे, बारस्कर, भुतकर यांनी मनपात येवून स्वतंत्र चर्चा केली. यात दीपाली बारस्कर यांचा अर्ज दाखल करण्याचाही निर्णय झाला.

यावेळी सचिन जाधव, दत्तात्रय मुदगल, सुरेश तिवारी आदींसह काही नगरसेवकांनी त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, बारस्कर या अर्ज दाखल करण्याचा निर्णयावर ठाम राहिल्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातांना संभाजी कदम यांनी त्यांना थांबविण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यांनी नगरसचिवांचे कार्यालय गाठून अर्ज दाखल केला. डॉ. बोरुडे सूचक तर भुतकर यांनी त्यांच्या उमेदवारीला अनुमोदन दिले. उपनगर भागाच्या विकासासाठी या परिसराला पद देणे गरजेचे होते. बैठकीत इच्छाही व्यक्‍त केली होती. मी माघार घेणार नसून सावेडी उपनगराला पद द्यायचे की नाही, हे नेत्यांनीच ठरवावे, असे बारस्कर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून शिवसेनेत अंतर्गत असलेली खदखद उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर पडल्याचे चित्र आहे. माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी मात्र हा वाद घरातला असल्याने चर्चा करुन बारस्कर यांची समजूत काढली जाईल, असे पत्रकारांशी बोलतांना सांगितले.