Thu, Nov 15, 2018 18:00



होमपेज › Ahamadnagar › भीमा कोरेगाव दंगलीमागे भाजप

भीमा कोरेगाव दंगलीमागे भाजप

Published On: Jan 13 2018 1:10AM | Last Updated: Jan 12 2018 11:45PM

बुकमार्क करा




कर्जत : प्रतिनिधी 

केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार हे समाजामध्ये फूट पाडण्याचे काम करीत आहे. भीमा कोरेगाव येथील दंगलीमागेे भाजपचा हात आहे, असा खळबळ जनक आरोप विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांनी केला. 

कर्जत येथे आयोजित तालुका राष्ट्रवादी काँगे्रस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले होते. यावेळी दादाभाऊ कळकमर, जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड, आविनाश आदिक, राजेंद्र फाळके, राजेंद्र गुंड आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी वळसे पुढे म्हणाले की, आपण कोरेगाव भीमा, सणसवाडी, वडूज या गावांना जाऊन आलो. येथील संरपच दलित आहेत. कोणीतरी बाहेरील 25 ते 30 युवक येथे आले व त्यांनी हे कृत्य केले. या घटनेमध्ये भाजपासाठी काम करणार्‍या हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग आहे. मनुवादी विचार आता राज्यात प्रभावी ठरत आहेत. तसे झाल्यास बहुजन समाजाला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रासाठी आयुष्य वेचणार्‍या शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण, शरद पवार, आणि इतरांचे सर्व कष्ट वाया जाणार का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. 

देशात आणि राज्यात विकास गायब आहे. कोपर्डीपासून नागपूरपर्यंत महिला असुरक्षित आहेत. दररोज खून, दरोडे, बलात्काराच्या  घटना घडत आहेत. युवक बेरोजगार झाला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. सरकार रोज नवीन आश्‍वासने देत असलेतरी, राज्य दिवाळखोरीत गेले आहे. यामुळे सर्वांनी रस्त्यावर उतरून पालकमंत्र्यांना यांना रस्त्यावर जाब विचारावा आणि जनतेची कामे करण्यास भाग पाडावे, असे वळसे म्हणाले.

जिल्हाध्यक्ष घुले म्हणाले, राज्यामध्ये अराजकता माजली आहे. सरकार सर्व बाबींवर अपयशी ठरले आहे. यामुळे यास जबाबदार असलेल्या मंत्री आणि आमदारांना धारेवर धरा, आंदोलने करा. राजेंद्र फाळके यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यावर टीका केली. आघाडी सरकारच्या काळात झालेल्या बंधार्‍यांतील माती काढून त्यामध्ये पैसे खाल्ले आणि पाणी साठले की सेल्फी घेत आहेत. मार्केट कमिटीतील 200 कोटी कोठे गेले? तुकाई चारी, एसटी डेपो झालेच नाही. नुसत्याच घोषणांना आता जनता कंटाळली असल्याचे ते म्हणाले.

नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीकडेच!

गुजरात निवडणुकीमध्ये भाजपची अवस्था फार वाईट झाली आहे. देशात व राज्यात भाजप-शिवसनेच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका केव्हाही घोषित होऊ शकतात. या निवडणुकीसाठी काँगे्रस, राष्ट्रवादी व समविचारी पक्ष एकत्र येणार आहेत. दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यातरी नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीच लढवणार आहे. मात्र, अंतिम निर्णय शरद पवार हेच घेतील, असे वळसे म्हणाले.