होमपेज › Ahamadnagar › राहात्यात होळीला राजकीय शिमगा

राहात्यात होळीला राजकीय शिमगा

Published On: Mar 02 2018 1:20AM | Last Updated: Mar 02 2018 12:54AMराहाता : प्रतिनिधी

राहाता शहरात पारंपारिक पद्धतीने होळी प्रज्वलित करण्याचा मान कोणाला द्यायचा ? यात राजकीय संघर्ष होऊन पोलिस बंदोबस्तात भाजपा व विरोधी शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्वतंत्र दोन होळ्या गणपती मंदिरासमोर पेटविल्याने काहीकाळ शहरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला. 

राहाता शहरात गेल्या अनेक वर्षांपासून शहरात गणपती मंदिरासमोर राहाता शहरवासीय होळी पेटवितात. अनेक वर्षांपासून ही परंपरा या होळीच्या दर्शनासाठी शहरातील नागरिक त्या ठिकाणी सायंकाळी येतात. शहरातील काही नागरिक एकत्र येऊन या होळीसाठी वर्गणी जमा करून त्या ठिकाणी विधिवत पूजा करून या ठिकाणी होळी पेटवितात. परंपरेप्रमाणे येथील स्थानिक नागरिकांनी वार्ताफलकावर फलक लिहून काही नागरिकांच्या हस्ते होळी पेटविली जाणार, असे लिहिले.

शेजारीच दुसर्‍या फलकावर नगराध्यक्ष ममता पिपाडा यांच्या हस्ते होळी पेटविली जाणार असा दुसरा फलक लिहिल्याने त्या ठिकाणी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळी होळी पेटविण्याचे साहित्य आणून ठेवले व सायंकाळी 6 वाजता राहाता शहराच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा, डॉ. राजेंद्र पिपाडा, धनंजय गाडेकर, मयूर कुंभकर्ण, अभिजित काळे, राजेंद्र गाडेकर व त्यांच्या गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमले. लगेचच काँग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमले. त्यात उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, कैलास सदाफळ, बाळासाहेब सदाफळ, दशरथ तुपे, सुनीता टाक, राजेंद्र अग्रवाल, निवृत्ती लुटे आदी नेते व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. 

काँग्रेस व शिवसेनेचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी होळी पेटविली. त्यांच्याच शेजारी स्वतंत्र दुसरी होळी नगराध्यक्षा पिपाडा गटाने पेटविल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. कार्यकर्त्यांनी धार्मिक घोषणा द्यायला सुरुवात केली. तात्काळ त्या ठिकाणी पो. नि. बाळकृष्ण कदम यांनी त्यांच्या सहकार्‍यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील वाद टळला. पोलिस बंदोबस्तात शहरात प्रथमच दोन स्वतंत्र होळी पेटविल्याने शहरात चर्चा होती. अशाप्रकारे राजकारण या धार्मिक सणाला बाधा आणू नये, अशी चर्चा नागरिकांमध्ये होती. 

नगराध्यक्षांना जाणीवपूर्वक डावलले

परंपरेप्रमाणे होळी पेटविण्याचा मान हा नगराध्यक्षांचा आहे. ती परंपरा खंडित करून यावेळी यात राजकारण आणून जाणीवपूर्वक नगराध्यक्षांना डावलले. धार्मिक ठिकाणी अशा पद्धतीचे राजकारण करू नये, आमची सत्ता नसताना आम्ही त्यांना कुठल्याही कामात अडथळा निर्माण केला नाही. मग त्यांनी नगराध्यक्षांचा कारभारात अडथळा आणू नये. ही राहाता शहरातील नागरिकांची होळी आहे. यात राजकारण नको.    - डॉ. राजेंद्र पिपाडा, भाजपा नेते

होळी पेटविण्यात राजकारण आणू नका

गेल्या 20 वर्षांपासून येथील नागरिक ही होळी  कोणाच्या हस्ते पेटवायची हे ठरवतात. या होळीचा मान नगराध्यक्षांचा आहे, असे कोठेही नमूद केलेले नाही. ही होळी राजकीय पक्षाची नसून येथील नागरिकांची आहे. या होळीचे आयोजन करणारे नागरिक ठरवतात त्यांच्याच हस्ते ही होळी पेटविली जाते. यात राजकारण आणू नये.   - कैलास सदाफळ, माजी नगराध्यक्ष