Tue, Mar 19, 2019 15:59होमपेज › Ahamadnagar › भाजप कार्यकर्त्यांनी काढला शासनाविरोधात मोर्चा

भाजप कार्यकर्त्यांनी काढला शासनाविरोधात मोर्चा

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 11:38PMपाथर्डी : शहर प्रतिनिधी

ऊसतोडणी कामगारांची फसवणूक करत शासनाने महामंडळ गुंडाळल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी शासनाच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यासाठी पुकारण्यात आलेल्या शहरबंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आंदोलनाचे नेतृत्व भाजप शहराध्यक्ष तथा गोपीनाथ मुंडे विचार मंचाचे अध्यक्ष नागनाथ गर्जे, सुनील पाखरे, संदीप भडके यांनी केले. 

राष्ट्रीय महामार्गावरील वसंतराव नाईक पुतळ्यासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनात आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड, मनसेचे अविनाश पालवे, संतोष जिरेसाळ, विजय भगत, हरी पालवे, अक्षय पाखरे, विजय शिरसाठ,अभय गांधी, जालिंदर काटे, पंकज मुनोत, अनंत कराड, युसूफ शेख, संदीप गर्जे, नितीन उरणकर, बाबू मर्दाने, भास्कर पोटे या सह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

आंदोलकांनी शहर बंद पुकारल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. भाजप कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात आंदोलन पुकारल्याने पदाधिकारी व नेत्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवली. यावेळी बोलताना नागनाथ गर्जे म्हणाले की, ऊसतोडणी कामगारांचा प्रभाव असलेला हा तालुका असून या निर्णयामुळे तोडणी कामगारांच्या मनात शासनाविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

तोडणी कामगारांचा शासनाने जो अपमान केला आहे त्याची किंमत शासनाला मोजावी लागेल. कामगारांची फसवणूक करण्याचे  पाप शासनाने केले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाखो तोडणी कामगारांनी भाजपला मते दिली. मतांसाठी ऊसतोडणी कामगारांची मते चालतात. विश्‍वास संपादन करण्यासाठी मुंडेंना पुढे केले गेले. त्यांच्या निधनानंतर कामगारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे झाल्याने आगामी काळात कामगार स्वस्थ बसणार नाही. तोडणी कामगारांचे दैवत फक्त गोपीनाथ मुंडे असून कोणत्याही राजकीय पक्षाचे त्यांना देणे घेणे नाही. मुंडेच्या नंतर पंकजा मुंडे यांना कामगार दैवत मानतात.

या वेळी बोलताना सुनील पाखरे म्हणाले की, मुख्यमंत्री,ग्रामविकासमंत्री, सहकारमंत्री व सहकार आयुक्त यांची भेट ऊसतोड मजूर, मुकादम यांचे शिष्टमंडळ घेऊन मुंबईला भेट घेणार आहोत. कामगारांवर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधून शासनाला निर्णय बदलण्याची विनंती करू. यावेळी माजी आमदार दगडू बडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.