Thu, Apr 25, 2019 23:24होमपेज › Ahamadnagar › भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Published On: Feb 18 2018 1:54AM | Last Updated: Feb 17 2018 11:06PMकोपरगाव : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आशुतोष काळे यांचा पुतळा जाळण्यावरून  भाजपा-शिवसेना रिपाइं व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आज भरचौकात एकमेकांना भिडले. हाणामारी व घोषणाबाजीमुळे मुख्य रस्ता शनिवारी सकाळीच दणाणून गेला. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे कार्यकर्ते व बघ्याची पळापळी यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.  

शुक्रवारी (दि. 16)  रोजी कोपरगावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपा-शिवसेना सरकारच्या विरोधात हल्लाबोल सभा आयोजित केली होती. त्यात युवानेते आशुतोष काळे यांनी भाजपाच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याविषयी अपशब्द वापरून शेलक्या भाषेत टीका केली. ती भाजपा-सेना रिपाइं कार्यकर्त्यांना चांगलीच झोंबली. त्यामुळे त्यांनी काल (शनिवारी) आशुतोष काळे यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यासाठी भाजपा- सेना-रिपाइं युतीचे कार्यकर्ते व महिला नगरसेविका मोर्चाने शहरातील विघ्नेश्‍वर चौकात आले.

यावेळी शिवाजी पुतळयाकडे दबा धरून बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते जोरात पळत आले. त्यांनी पुतळा पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ व हाणामार्‍या सुरू झाल्या. कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले पाहून बंदोबस्तासाठी आलेेल्या पोलिसांनी वरिष्ठांना खबर दिल्यानंतर पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव व त्यांचे सहकारी विशेष पोलिस कृति-दलाचे जवान घेऊन घटनास्थळी दाखल झाले. 

दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करीत कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. यावरून दोन्ही गटांचे कार्यकर्ते चिडले व घोषणाबाजी करून एकाच पक्षाच्या कार्यकर्त्यांना उचलू नका, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना उचला, अशी भूमिका मांडली. पोलिसांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे सांगत लाठीमार करावा लागेल, असा इशारा दिल्यावर जमाव शांत झाला.

यानंतर भाजपाच्या नगरसेविका शिल्पा रोहमारे यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संदीप गोरखनाथ वर्पे, समीर गोरखनाथ वर्पे, सुनील वसंत गगुले, वाल्मिक जयसिंग लहिरे, हिरामण वसंत गंगुले (सर्व रा. कोपरगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांनी विघ्नेश्वर चौकात लाकडी दांडे व चाकू सारखे धारधार हत्यार घेऊन फिर्यादी रोहमारे व तिच्या सोबतच्या भाजपच्या नगरसेविका यांना शिवीगाळ करून झटापट करून लगट निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील वसंत गंगुले (रा. गांधीनगर) यांनी पोलिसात महिलांच्या अंगावर गेले, म्हणून भाजपाचे पराग शिवाजी संधान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय सोनवणे, उपनगराध्यक्ष विजय गोविंद वाजे, फिरोज युसूफ पठाण व रवींद्र रामराव रोहमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा निषेध करण्यासाठी जमा झालो होतो. त्याचवेळी आमचे नेते आशुतोष काळे यांचा पुतळा वरील आरोपी घेऊन येत असताना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.