Thu, Jul 09, 2020 06:18होमपेज › Ahamadnagar › भाजप, राष्ट्रवादीकडून माजी आ. गडाखांची कोंडी

भाजप, राष्ट्रवादीकडून माजी आ. गडाखांची कोंडी

Published On: Jul 04 2018 2:11AM | Last Updated: Jul 03 2018 10:15PMनेवासा : प्रतिनिधी

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगदी तीन दिवस अगोदर शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकला. त्यानंतर मोठे यश गडाखांना मिळाले. गेल्या 2 वर्षांपासून आ. बाळासाहेब मुरकुटे विविध संस्थांच्या निमित्ताने गडाख यांना कोंडीत पकडण्यात यशस्वी झाले आहेत. राष्ट्रवादी व भाजपानेे गडाखांना चक्रव्यूहात अडकवले आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव गडाख यांचा पराभव झाला. आ. मुरकुटे यांनी गेल्या 4 वर्षांपासून गडाख यांच्या ताब्यातील मुळा कारखाना, मुळा शैक्षणिक संस्था, नेवासा बाजार समिती, शनैश्‍वर देवस्थान, मुळा बँकेसह विविध संस्था आ. मुरकुटे यांनी रडारवर घेतल्या. शासन पातळीवर विविध तक्रारी करत गडाख यांच्या ’मुळा’वरच घाव घातला. यात आ. मुरकुटे यांना यश मिळाले असले, तरी नेवासा तालुक्यातील रस्ते, वीज, पाटपाणी या प्रश्नात त्यांना यश मिळाले नाही.

माजी आ. शंकरराव गडाख यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात पाटपाण्यासाठी उत्तरेतील तीन कॅबिनेट मंत्र्यांशी जाहीर पंगा घेतला होता. आता ते कुठल्याही राष्ट्रीय पक्षात नसल्याने त्यांना कुठल्याही मोठ्या राजकीय नेत्याचा पाठिंबा मिळत नाही. त्यामुळे गडाख हे एकटे पडले आहेत. ते दुसर्‍या कुठल्या पक्षात प्रवेश करतील की नाही, हे आज सांगता येत नाही. परंतु आज गडाख कसे अडचणीत येतील, यासाठी मोठे नेते प्रयत्न करत आहेत. आ. मुरकुटे यांना अगदी काँग्रेस, राष्ट्रवादीकडून अंधारात मदत होत आहे.

येणार्‍या विधानसभेला भाजप पक्षाकडून मुरकुटे यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून माजी आ. नरेंद्र घुले, पांडुरंग अभंग, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यापैकी एकाला उमेदवारी दिली जाईल, असा अंदाज आहे. घुले कुटुंबाला मानणार मोठा वर्ग नेवासा तालुक्यात आहे. जर घुले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार झाले, तर मुरकुटे व गडाख यांच्यासाठी ते धोक्याची घंटा ठरू शकते. या परिस्थितीत गडाख यांचे सर्व मार्ग बंद होऊन त्यांना क्रांतिकारी पक्षकडूनच उमेदवारी करावी लागेल. नेवासा तालुक्यात गडाख-मुरकुटे यांच्यापासून नाराज झालेल्या काही तरुण नेत्यांची तिसरी आघाडी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यात घोडेगाव येथील एका तरुण नेत्याने पुढाकार घेतला आहे.