Sat, Jul 20, 2019 23:43होमपेज › Ahamadnagar › नगर : भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंसह दोघांना अटक

नगर : भाजप आमदार शिवाजी कर्डिलेंसह दोघांना अटक

Published On: Apr 10 2018 1:17AM | Last Updated: Apr 10 2018 1:17AMनगर : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केल्याप्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिले हे सोमवारी (दि. 9) सकाळी पोलिसांना शरण आले. भिंगार कॅम्प पोलिसांनी कर्डिले यांच्यासह अफजल शेख यालाही अटक केली आहे. दोघांनाही न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

केडगाव येथील दुहेरी खून प्रकरण व पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून आ. संग्राम जगताप यांना पळविल्याप्रकरणी आ. कर्डिले यांच्याविरुद्ध अनुक्रमे कोतवाली व भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. काल (दि.9) सकाळी आ. कर्डिले हे स्वतःहून कॅम्प पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी या गुन्ह्यातील आणखी एक आरोपी अफजल शेख यालाही अटक केली.

वैद्यकीय तपासणीनंतर आ. कर्डिले यांना पुन्हा कॅम्प पोलिस ठाण्यात आणले व त्यानंतर दुपारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पाटील यांच्यासमोर हजर करण्यात आले. सहाय्यक पोलिस अधीक्षक संदीप पाटील व सरकारी वकील अ‍ॅड. ज्योती लक्का यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. ते म्हणाले की, आ. कर्डिले यांच्या उपस्थितीत पोलिस अधीक्षक कार्यालयाचा दरवाजा तोडून पोलिसांवर दगडफेक करून शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली. आ. कर्डिले हे भाजपाचे आमदार असून, त्यांच्याकडून अनोळखी 200 ते 300 आरोपींची नावे माहित करून घ्यावयाची आहेत. अफजल शेख याच्याकडेही गुन्ह्याबाबत सखोल चौकशी करायची आहे. गुन्ह्यात वापरलेले लाकडी दांडके, काठ्या हस्तगत करणे बाकी आहे. सरकारी कार्यालयावर हल्ला करण्यामागे आणखी काही हेतू आहे का, याची चौकशी करायची आहे. त्यामुळे दोनही आरोपींना 7 दिवस पोलिस कोठडी देण्यात यावी.

त्यानंतर आरोपींच्या वकिलांनी बचावाचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आ. कर्डिले व अफजल शेख या दोघांनाही उद्या (दि. 10) पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी अटक केलेल्या 22 जणांच्याही पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांनाही मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येईल. 

गुन्ह्यातील कलम केले कमी!

पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड करून पोलिसांवर दगडफेक केल्याच्या गुन्ह्यात भा.दं.वि. 333 (शासकीय सेवकास गंभीर दुखापत पोहोचविणे) अन्वये गुन्हा दाखल केला होता. वैद्यकीय अहवालात गंभीर दुखापत आढळून न आल्याने भा.दं.वि. 333 हे कलम कमी करून भा.दं.वि. 332 (शासकीय सेवकास इजा पोहोचविणे) हे कलम लावण्यात आलेले आहे. तसा अहवाल कॅम्प पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे.

पुरावे नसल्यास खुनाच्या गुन्ह्यात वर्ग नाही

आ. शिवाजी कर्डिले हे पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करून पोलिसांवर दगडफेक केल्याच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीत आहेत. तेथील कोठडी संपल्यानंतर त्यांना केडगाव येथील दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात येईल, अशी सर्वांची अपेक्षा आहे. परंतु, ती फोल ठरण्याची शक्यता आहे. आ. कर्डिले हे गुन्ह्यात सहभागी असल्याचे पुरावे उपलब्ध झाल्याशिवाय त्यांना खुनाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात येणार नाही, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

 

Tags : Ahmednagar, Ahmednagar news, Shivsainik murder case, Kedgaon, Shivaji Kardile, arrested,