होमपेज › Ahamadnagar › वीजबिलांचा भरणा थांबल्याने उत्पन्न ठप्प

वीजबिलांचा भरणा थांबल्याने उत्पन्न ठप्प

Published On: Mar 16 2018 12:44AM | Last Updated: Mar 16 2018 12:44AMनगर : प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून प्रणाली बसविण्यास टाळाटाळ होत असल्याने, महावितरणने बँकेतील वीजबिल भरणा थांबविला आहे. त्यामुळे बँकेला दरमहा मिळणारे लाखो रुपयांचे शाश्‍वत उत्पन्न ठप्प झाले आहे. तर दुसरीकडे जिल्हा बँकेच्या शाखेत वर्षानुवर्षे वीजबिलाचा भरणा करणार्‍या जिल्ह्यातील वीज ग्राहकांना बिल भरण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.  

वीजबिल स्वीकारल्याबद्दल महावितरण प्रत्येक बिलामागे ग्रामीण भागात  5 रूपये तर शहरी भागात 4 रुपये जिल्हा बँकेला अदा करते. डिसेंबर 2017 या महिन्यात जिल्ह्यातील 1 लाख 38 हजार 947 ग्राहकांनी त्यांच्या 19 कोटी  30 रुपयांच्या वीजबिलांचा भरणा जिल्हा बँकेच्या शाखेत केला होता. 

जानेवारी 2018 या महिन्यात 1 लाख 37 हजार 410 वीज ग्राहकांनी वीजबिलापोटी  16 कोटी 85 लाख रुपयांचा भरणा जिल्हा बँकेत केला. तर फेब्रुवारी 2018  या महिन्यात  71 हजार  744 वीज ग्राहकांनी  6 कोटी  71 लाख रुपये भरले. फेब्रुवारीच्या मध्यापासून ओसीसीएस प्रणाली नसलेल्या बँकेच्या शाखेत देयक स्वीकारणे बंद करण्यात आले आहे. परिणामी बँकेला वीज देयक स्वीकारण्यापोटी मिळणारे उत्पन्न थांबले असून, ग्रामीण भागातील वीज ग्राहकांनाही वीज देयक भरण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

ओसीसीएस प्रणाली बसविण्याबाबत महावितरणकडून जिल्हा बँकेकडे पाठपुरावा करण्यात आला. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महावितरणने जिल्हा बँकेतील वीज देयकांचा भरणा 16 फेब्रुवारी 2018 पासून थांबविला. त्यानंतर बँकेने 16 शाखांमध्ये तातडीने ओसीसीएस प्रणाली बसविण्याचे आश्‍वासन दिले. परंतु, आतापर्यंत केवळ 9 शाखांमध्येच ही प्रणाली बसविण्यात आली. त्यामुळे प्रणाली बसविलेल्या शाखांमध्येच वीज देयकांचा भरणा सुरू ठेवण्यात आला आहे. 

ग्राहकांना तत्पर व पारदर्शक सेवा मिळावी, या उद्देशाने महावितरणने ही मध्यवर्ती ऑनलाईन प्रणाली लागू केली आहे. सर्वच ठिकाणी ही प्रणाली बंधनकारक करण्यात आली असतानाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वीज देयक स्वीकारणार्‍या त्यांच्या  272 पैकी केवळ 9 शाखांमध्ये ही प्रणाली बसविली आहे. या शाखांमध्येच वीज देयक स्वीकारण्यात येत आहेत.