Fri, Apr 19, 2019 08:40होमपेज › Ahamadnagar › धान्य न मिळाल्याने ठोकले टाळे

धान्य न मिळाल्याने ठोकले टाळे

Published On: May 27 2018 1:16AM | Last Updated: May 26 2018 11:01PMकर्जत : प्रतिनिधी

येथील कर्जत अर्बन को ऑफ क्रेडीट सोसायटी या संस्थेचे स्वस्त धान्य दुकान आहे. या दुकानामधून दारिद्—य रेषेखालील नागरीकांना धान्य मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी दुकानास टाळे ठोकले.  

सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना शिधापत्रिकांची ऑनलाईन नोंदणी करणे सक्तीचे केले आहे. तसेच बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्याची सक्ती केली आहे. येथील अर्बन सेवा संस्थेंतर्गत असलेल्या अनेक शिधापत्रिकांची नोंद ऑनलाईन झालेली नाही. त्यामुळे अशा ग्राहकांना ते धान्य देत नाहीत. नावे आले की नाही याची विचारणा नागरिक करतात आणि पुन्हा कागदपत्रेही देतात. मात्र नावे काही यादीत येत नाहीत. मागील काही महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. हे सर्व नागरीक दारिद्—य रेषेखालील आहेत. अनेकांची चूल हे धान्य घरी नेल्यावर पेटणार आहे. पूर्वी धान्य मिळत होते आणि आता मिळत नाही. त्यामुळे अखेर काल (दि. 26) सकाळी महिला व पुरूष सगळेच संतप्त झाले. त्यांनी दुकानदारास बाहेर काढून दुकानाला टाळे ठोकले. जो पर्यंत आम्हाला धान्य मिळत नाही तोपर्यंत धान्य दुकान उघडू देणार नाही, असे सांगितले आहे.

या संदर्भात दुकानातील कर्मचारी शिंदे व नेवसे यांनी सांगितले की, आम्ही तालुका पुरवठा कार्यालयाकडे सर्व नागरिकांची माहिती व कागदपत्रे दिली आहेत. यामध्ये अनेक नागरिकांची नावे आलेली नाहीत. ज्यांची नावे नाहीत, त्यांना धान्य देता येत नाही. दिले तर आमच्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी कारवाई करीत आहेत. आम्ही तरी काय करणार? या बाबत तालुका पुरवठा अधिकारी शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाही.

यानंतर शिवसना तालुकाप्रमुख व सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष दीपक शहाणे, महावीर बोरा घटनास्थळी आले. त्यांनी नागरिकांशी चर्चा केली. या प्रकरणी तहसीलदारांना संस्थेचे अध्यक्ष कदिर सय्यद यांच्यासमवेत भेटू व निर्णय करून धान्य देऊ, असे नागरीकांना सांगितले.

धान्य देता येईल : सावंत

या प्रकरणी तहसीलदार किरण सावंत यांनी सांगितले की, ज्या नागरिकांची नोंद नवीन नियमाप्रमाणे आहेत, त्यांचे नाव ऑनलाईनला आले नसले तरी त्यांना धान्य देता येईल. तशी सूचना तालुका पुरवठा अधिकार्‍यांना देण्यात येईल.