Mon, Aug 19, 2019 15:16होमपेज › Ahamadnagar › श्रीपाद छिंदमच्या सुनावणीकडे लक्ष

श्रीपाद छिंदमच्या सुनावणीकडे लक्ष

Published On: Mar 01 2018 1:46AM | Last Updated: Feb 28 2018 11:23PMनगर : प्रतिनिधी

शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक रोड तुरुंगात असलेल्या श्रीपाद छिंदम याच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज (दि. 1) संपत आहे. त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात दोन गटांत तेढ निर्माण केल्याचे कलम वाढविल्याने पोलिस कोठडी मागितली जाऊ शकते. परंतु, गुरुवारी पोलिस कोठडी मागणार की नाही, याबाबत संभ्रम कायम आहे.

16 फेब्रवारी रोजी छिंदम याला अटक करण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी त्याला न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. सध्या तो नाशिक रोड कारागृहात आहे. त्याला पुन्हा न्यायालयीन कोठडी मागायची असल्यास न्यायालयात आणण्याची आवश्यकता नाही. परंतु, पोलिस कोठडी मागायची असल्यास नगर येथील न्यायालयात हजर करणे आवश्यक आहे. छिंदम याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान 153 अ हे कलम वाढविण्यात आलेले आहे. या कलमान्वये तपासी अधिकार्‍यांकडून न्यायालयात पोलिस कोठडीची मागणी केली जाऊ शकते.

परंतु, पोलिस कोठडी मागायची की नाही, याबाबत तोफखाना पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक विनय चौबे यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. परंतु, त्यांच्या चर्चेतील तपशील समजू शकला नाही. त्यामुळे छिंदम याला गुरुवारी नगरच्या न्यायालयात हजर करणार की नाही, हे गुलदस्त्यातच आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील हे करीत आहेत.