Thu, May 23, 2019 04:29होमपेज › Ahamadnagar › जिल्हा टंचाईमुक्त होण्यासाठी प्रयत्न : राम शिंदे

जिल्हा टंचाईमुक्त होण्यासाठी प्रयत्न : राम शिंदे

Published On: May 04 2018 1:54AM | Last Updated: May 03 2018 11:31PMनगर : प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनाचे नियोजन, लोकप्रतिनिधींचा पुढाकार, प्रसारमाध्यमांची सकारात्मक साथ आणि वाढत्या लोकसहभागामुळे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातंर्गत चांगले काम झाले. यावर्षी श्रमदानाच्या माध्यमातून अनेक गावे पाणीदार होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्हा टंचाईमुक्त होण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित  माने, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, महापालिका आयुक्त घन:शाम मंगळे आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शानदार संचलन झाले.  

पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार जेऊर  येथील तलाठी एम.एम. पठाण यांना प्रदान करण्यात आला. श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग शिंदे यांनाही सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. 

पोलिस निरीक्षक सुनील पवार, प्रताप इंगळे, उपनिरीक्षक  सत्यवान माशाळकर आणि प्रमोद भिंगारे, उपनिरीक्षक कल्पना चव्हाण, पोलिस नाईक मनीषा निमोणकर, कॉन्स्टेबल कोमल शिंदे, सहायक फौजदार दिलीप सोनुले, आल्ताफ शेख, हेड कॉन्स्टेबल अंबादास शिंदे, राजेंद्र गोडगे, काकासाहेब जगदाळे यांनाही गौरवण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, वामन कदम, ज्योती कावरे, तहसीलदार गणेश मरकड, सुधीर पाटील, आप्पासाहेब शिंदे आदींसह अधिकारी, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

नगर राज्यात बदनाम; पालकमंत्र्यांची कबुली

मागील काही दिवसांत घडलेल्या घटना दुर्दैवीच आहेत. महिनाभरातील या घटनांमुळे जिल्ह्याचे वाईट चित्र राज्यात गेल्याचे सांगत राज्यभरात नगरचे नाव बदनाम झाल्याची अप्रत्यक्ष कबुली पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली. अशा घटना परत घडू नयेत, यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. पोलिस प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहेत. त्यानंतरही घटना घडल्यास संबंधित क्षेत्रातील पोलिस निरीक्षकावर सर्वप्रथम कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालकमंत्री राम शिंदे यांनी ध्वजारोहणानंतर पत्रकारांशी बोलतांना दिला.