Sun, Feb 23, 2020 15:07होमपेज › Ahamadnagar › महसूल पथकाच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न

महसूल पथकाच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न

Published On: Aug 26 2019 1:43AM | Last Updated: Aug 26 2019 1:43AM
पारनेर/टाकळी ढोकेश्‍वर : वार्ताहर

बेकायदा वाळू वाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई करणार्‍या तहसीलदार प्रविण चव्हाणके व त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांच्या अंगावर डंपर घालून चिरडण्याचा प्रयत्न नगर-कल्याण महामार्गावर झाला. चव्हाणके व कर्मचारी प्रसंगावधानाने बाजूला पळाल्याने मोठा अनर्थ टळला. वाळू तस्कराने जवळच्या शेतात डंपर पळविला. मात्र तेेथील खड्ड्यात तो पलटी झाल्यानंतर चालक पसार झाला.

तहसीलदार चव्हाणके, अव्वल कारकून पंकज जगदाळे, लिपीक डी. डी. पवार, जवळ्याचे तलाठी आकाश जोशी, ढवळपुरीचे तलाठी व्ही. व्ही. वाघमारे, किन्हीचे तलाठी बी. एम. मसलेकर हे नगरहून कामकाज आटोपून नगर-कल्याण महामार्गावरून पारनेरकडे येत होते. भाळवणी शिवारात सायंकाळी साडेसातच्या सुमारास हॉटेल यशराज जवळ वाळूचा विना क्रमांकाचा डंपर नगरच्या दिशने जात होता. या पथकाने इशारा करून तो थांबविला. त्यात चार ब्रास वाळू होती. वाहतूक व उत्खननाचा परवाना  नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

चव्हाणके यांनी चालकास ओळख सांगून डंपर कारवाईसाठी पारनेरच्या दिशेने घेण्याची सूचना केली. मात्र चालकाचा पारा चढून तो आरेरावी करू लागला. त्याने पथकास न जुमानता डंपर तेथून पळविण्याचा प्रयत्न केला. चव्हाणके व कर्मचार्‍यांनी तो आडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पथकाच्या अंगावर डंपर घालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून बाजूला पळाल्याने सगळे बालंबाल बचावले. त्यानंतर चालकाने मधुरा हॉटेलच्या दिशेने डंपर पळवून शेतात घातला. मात्र डंपर शेतातील खड्ड्यात पलटी झाला. त्यानंतर चालक पसार झाला. 

त्यानंतर डंपर मालक बापू बन्सी सोनवणे घटनास्थळी आला. त्यानेही तहसीलदार व पथकाशी आरेरावी केली. पथकाने त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, त्याने जोडीदारासोबत धूम ठोकली. पथकाने पंचनामा करून प्रांताधिकारी, पोलिसांना ही माहिती दिली. रात्री डंपर ताब्यात घेता आला नाही. पारनेर पोलिस ठाण्यात कारवाईची नोंद करण्यात आली. दुसर्‍या दिवशी क्रेनच्या मदतीने डंपर आणण्यासाठी पथक घटनास्थळी गेले. मात्र डंपर गायब होता. चव्हाणके यांनी पारनेर पोलिस ठाण्यात डंपर चालक पिन्या (पूर्ण नाव दाखल नाही, रा. भिलहाटी वस्ती, जखणगाव, ता. नगर) व मालक बापू बन्सी सोनवणे (रा. हिंगणगाव, ता. नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.